पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची (आप) सत्ता आल्यास अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होतील, या शक्यतेला आज पूर्णविराम मिळाला. स्वत: अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भातील वृत्त फेटाळून लावत पंजाबचा मुख्यमंत्री ही राज्यातील व्यक्ती असेल, हे स्पष्ट केले. ते बुधवारी पटियाला येथील प्रचारसभेत बोलत होते. मी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी असताना पंजाबचा मुख्यमंत्री कसा काय होऊ शकतो? पंजाबचा मुख्यमंत्री हा याच भूमीतील असेल, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री कोणीही झाले तरी पंजाबच्या जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील, याची वैयक्तिक ग्वाही मी देतो, असेही केजरीवाल यांनी म्हटले.
आपचे नेते मनिष सिसोदिया यांनी मंगळवारी पंजाबमधील प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यानंतर अरविंद केजरीवाल पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाली होती. चंदीगडजवळील मोहालीतील सभेत बोलताना सिसोदिया यांनी म्हटले होते की, तुमचे मत केजरीवालांसाठी असले पाहिजे. तेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचे गृहीत धरून मतदान करा. या सभेनंतर सिसोदिया यांना विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री ठरविण्याचा अधिकार आमदारांना असल्याची मखलाशी केली होती. पण केजरीवाल यांच्या नावाचा स्पष्टपणे इन्कारही केला नव्हता.  त्यामुळे केजरीवालांबद्दल चर्चा सुरू झाली होती. पंजाबसाठी ‘आप’ने अद्यापपर्यंत आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. किंबहुना याच मुद्दय़ावरून माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू याच्याबरोबर केजरीवालांचा समझोता होऊ  शकला नव्हता. आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याची सिद्धूची अट होती आणि त्यास केजरीवाल तयार नव्हते. याउलट ‘आप’ने उपमुख्यमंत्रिपद दलित व्यक्तीस देण्याचे जाहीर केले आहे. पंजाबमधील ३५ टक्के दलित मतांवर डोळा ठेवून ही घोषणा केली आहे. पंजाबमध्ये ४ फेब्रुवारीला मतदान होत आहे.

पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुका ‘आप’साठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. पंजाब आणि गोवा जिंकून २०१९च्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्पर्धेत उतरण्याची त्यांची योजना आहे. दिल्लीचे मुख्यमंत्रिपद असले तरी केंद्र सरकारचे अधिकार असल्याने अनेक मर्यादा येतात. यामुळेच मोठय़ा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविण्याची केजरीवाल यांची योजना आहे. त्या दृष्टीने पंजाब जिंकून सत्ता मिळविण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. पंजाबमधील ५५ टक्क्यांपेक्षा जास्त शीख मतदारांची संख्या लक्षात घेता त्यांनी स्वत:ची मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी जाहीर करण्याचे टाळले आहे. कारण पंजाबमध्ये बिगर शीख मुख्यमंत्री स्वीकारला जाणार नाही. गोव्यात ईव्हान गोम्स यांची मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर करून केजरीवाल यांची भाजपच्या विरोधात जाऊ शकणारी ख्रिश्चन मते मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.