दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यातील संघर्ष हा अहंगंडाच्या लढाईचा परिपाक असून ते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल हा महत्त्वाचा प्रश्न अपरिपक्वपणे हाताळत आहेत, अशी टीका स्वराज अभियानचे प्रवर्तक योगेंद्र यादव यांनी केली.
आप सत्तेवर आल्यानंतर दोन महिन्यांतच योगेंद्र यादव यांना मतभेदांमुळे पक्षातून काढण्यात आले होते. ते म्हणाले की, राजकीय पक्ष आताच स्थापन करण्याचा आपला विचार नाही. आमचा मंच एक गंभीर राजकीय पर्याय देशात निर्माण करील, तसेच बिहारमध्ये व निवडणुका होत असलेल्या इतर राज्यांत काही उमेदवारांना पाठिंबा देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आम आदमी पक्षातील घडामोडींबाबत त्यांनी सांगितले की, दिल्लीत अधिकारांसाठी जो संघर्ष सुरू आहे त्यात केजरीवाल यांनी अपरिपक्वता दाखवली. दिल्लीला राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे, बदल्यांचे, नेमणुकांचे अधिकार असले पाहिजेत, पण कायद्यानुसार सध्या तशी परवानगी नाही. आम आदमी पक्षाने पहिल्यांदा राजकारणात आलेल्या लोकांना फसवले व आता आम्ही त्यांना एकत्र आणून नवीन पर्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम आदमी पक्षातून आपल्याला काढले याची खंत करीत बसणे आपल्याला योग्य वाटत नाही. राजकारण म्हणजे निवडणुका लढवणे नव्हे किंवा सरकार स्थापन करणेही नव्हे. लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी उमेदवारांना पाठिंबा देऊ. स्वराज अभियानच्या खर्चाबाबत विचारले असता ते म्हणाले की, आमचा खर्च थोडा आहे, आमचे बँक खातेही नाही, देणग्यांतून आम्ही खर्च चालवतो आहोत.