नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भाजपमधील जेष्ठांची त्यांच्याविषयची नाराजी हा नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. दिल्ली सरकारच्या अर्थसंकल्पाच्यानिमित्ताने पुन्हा एकवार याचा प्रत्यय आला. येत्या १५ मार्चला दिल्ली सरकारचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांची मदत घेतली आहे. मात्र, यामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे. मोदी आणि शहा या जोडगळीने भाजपची सूत्रे हाती घेतल्यानंतर पक्षातील लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि यशवंत सिन्हा यांच्यासारख्या जेष्ठांची रवानगी मार्गदर्शक मंडळात करून त्यांना एकप्रकारे बाजूला सारले होते. यशवंत सिन्हा यांनी त्यावेळी मार्गदर्शक मंडळ या संकल्पनेची खिल्लीही उडविली होती. मोदी यांनी मंत्रिपदासाठी ७५ वर्षांची वयोमर्यादा निश्चित केल्यानंतरही सिन्हा यांनी नाराजी व्यक्त केली होती. सध्याच्या काळात ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती ‘ब्रेन डेड’ म्हणून घोषित केल्याचे त्यांनी म्हटले होते.
यशवंत सिन्हा यांनी वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या याच अनुभवाचा उपयोग केजरीवाल दिल्ली सरकारचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी करणार आहेत.