केरळ: मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी; आरोग्यमंत्री केके शैलजा यांना डच्चू

केके शैलजा यांना डच्चू दिल्याने आश्चर्य

केरळमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्यांची पुन्हा एकदा सत्ता आली आहे. सीपीआय (एम)च्या राज्य समितीने पिनरायी विजयन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याबाबत खलबतं सुरु होती. मात्र नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. मागच्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेल्या केके शैलजा यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.

केके शैलजा यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. केरळमध्ये करोनाकाळात केके शैलजा यांनी चांगली कामगिरी केली होती. या कामगिरीची दखल देशानं घेतली होती. यापूर्वी निपाह विषाणूशी लढण्यातही केके शैलजा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांची वर्णी मंत्रिमंडळात न लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. मागच्या सरकारमधील मुख्यमंत्री पी विजयन सोडले कुणालाच संधी मिळालेली नाही, असं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केके शैलजा यांची पक्षाची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे.

लहान मुलांवर करोनाचं सावट; ‘झोपेतून जागे व्हा…’ काँग्रेस नेते राहुल गांधींचा सरकारला इशारा

केके शैलजा या शैलजा टीचर या नावानेही ओळखल्या जातात. केके शैलजा यांनी केरळ विधानसभेसाठी मत्तान्नूर विधानसभेतून निवडणूक लढवली होती. त्यांना या विधानसभेतून ६१.९७ टक्के इतकी मतं मिळाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Keral government new cabinet dropped ex health minister kk shailaja rmt