करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनचा सकारात्मक प्रभाव पाहता केरळमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउनचा अवधी वाढवण्यात आला आहे. केरळमध्ये आता लॉकडाउन २३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

केरळमध्ये लॉकडाउन १६ मे पर्यंत होता. मात्र करोनाचा फैलाव आणि रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आता एका आठवड्यांचा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. राज्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिरुवनंतपुरम, एर्नाकुलम, त्रिशूर आमि मलाप्पुरममध्ये ट्रिपल लॉकडाउन लावला जाणार आहे. या शहरांमध्ये करोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

केरळमध्ये गेल्या २४ तासात ३४,६९६ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका दिवसात ९३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत १६ लाख ३७ हजार लोकांनी करोनावर मात केली आहे.

लपवाछपवी! गुजरातमध्ये दिवसाला १,७४४, तर ७१ दिवसात सव्वालाख लोकांचा मृत्यू

देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४३ हजार १४४ नवीन रुग्ण आढळले. पण दिलासादायक वृत्त म्हणजे सर्वाधीक रुग्ण बरे होऊण घरी गेले आहेत. ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्णांनी करोनावर मात केली. तर ४००० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. देशात करोनाची लागण होण्याचे प्रमाण दोन कोटींच्या पुढे गेले आहे. तर करोनामुळे मृत्यूंचा आकडा २.६२ लाखांच्या वर पोहोचला आहे.