केरळ  हे कोविड रुग्णांच्या संख्येतही वरच्या क्रमांकाच्या राज्यांमध्ये असताना आता तेथे झिका विषाणूने डोके वर काढले आहे. तेथे झिकाची लागण १४ जणांना झाली असून डेंग्यूच्या एडिस इजिप्तीसारख्या डासामुळे हा रोग होतो.

केरळ राज्यात दोन दिवसांत या रोगाचे रुग्ण सापडले आहेत. तिरुअनंतपुरम येथे एका २४ वर्षीय गर्भवती महिलेला झिका विषाणूची लागण झाली होती. शनिवारपर्यंत या रोगाच्या रुग्णांची संख्या १४ झाली आहे. आणखी १३ नमुने सकारात्मक आल्याने ही संख्या १४ झाली आहे.

आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, आमचा विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोविडमध्ये आमची रुग्णसंख्या कमी आहे. केरळात प्राणवायूअभावी कुणी मरण पावलेले नाही. झिका विषाणूविरोधात केरळने कृती योजना तयार केली आहे. त्यामुळे झिकाचा प्रसार होणार नाही. शुक्रवारी केंद्राने तज्ज्ञांचे पथक तेथे पाठवले होते. राज्य सरकारच्या मदतीसाठी काही सामुग्रीही पाठवली होती.

दरम्यान कर्नाटकच्या आरोग्य खात्याने अधिकाऱ्यांना सतर्कतेचा आदेश दिला असून डास नियंत्रण करण्यास सांगितले आहे. तामिळनाडूतही सर्वत्र दक्षता बाळगण्यात येत आहे. डेंग्यू, हिवतापाप्रमाणेच झिका हा डासातून पसरणारा विषाणू आहे. विशेष म्हणजे हा डास दिवसाच चावतो. त्यामुळे चिकुनगुन्याही होऊ  शकतो. झिकाची लागण झाल्यानंतर ताप येतो. पण त्याचे निदान अवघड असते. अनेक रुग्ण फ्लू झाल्याचे समजतात पण त्यांना झिकाने ग्रासलेले असते. साध्या लक्षणांमध्ये ताप, अंगावर लालसर चट्टे यांचा समावेश असून त्याचा अधिशयन काळ १४ दिवसांचा आहे.

भारतात २०१७ पासून रुग्ण

झिका विषाणू हा भारताला नवीन नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार २०१७ मध्ये पहिला रुग्ण सापडला होता. फेब्रुवारीमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने झिका ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली होती. भारतात गुजरातमध्ये पहिला रुग्ण सापडला होता, नंतर केरळात रुग्ण सापडला. झिकाने माणूस मरत नाही. दिवसा डास चावल्याने हा रोग होतो. त्यावर विश्रांती व औषधे हेच उपाय आहेत. यात रुग्ण बरे होतात. १ टक्का रुग्ण मरण पावतात. सध्या तरी झिकावर उपाय नाही पण फ्रान्सने त्यावर सुरक्षित व प्रभाव लस शोधून काढण्याचे काम सुरू केले आहे.