केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यात ६५ वर्षीय व्यक्तीच्या हत्येप्रकरणी तपास करताना पोलिसांसमोर धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत व्यक्तीच्या अल्पवयीन नातीने आयफोन आणि तिच्या बॉयफ्रेंडला बाइक खरेदी करण्यासाठी आजोबांच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा दावा आहे. या कटात तिने तिच्या तीन अल्पवयीन मित्रांना सहभागी करून घेतले. याबद्दल द इंडियन एक्सप्रेसने सविस्तर वृत्त दिले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुणांनी आजोबांची हत्या केल्यानंतर त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड केले आणि ते नातीला पाठवले. त्यानंतर त्यांनी मृताच्या घरातून सुमारे सहा सोन्याचे दागिने घेऊन पळ काढल्याचा आरोप आहे.
घरात आजोबा एकटे असल्याची संधी साधली
मृत व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून अलाप्पुझा येथे भाड्याच्या घरात एकटे राहत होते. त्यांच्या मुलीला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांची पत्नी मुलीबरोबर रुग्णालयात राहत होती. पोलिसांच्या मते, नातीला आजोबा घरात एकटे असल्याची माहिती होती. त्यामुळे तिने आपल्या मित्रांबरोबर हत्येचा कट आखला.
“तिला स्वतःसाठी आयफोन आणि बॉयफ्रेंडसाठी दुचाकी खरेदी करायची होती. आजोबा घरात एकटे असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने मित्रांबरोबर कट रचला,” अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
हात-पाय बांधले, गळ्याभोवती दोरी
स्थानिक नागरिकांनी मृत व्यक्तीला शेवटचे शनिवारी संध्याकाळी पाहिले होते. सोमवारी सकाळी नात त्यांच्या घरी आली. दरवाजा उघडत नसल्याचे सांगून तिने शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि पोलिसांना कळवले.
घरात वृद्धाचा मृतदेह आढळला. त्यांचे हात-पाय कापडाने बांधलेले होते, तर गळ्याभोवती दोरी आवळलेली होती. प्राथमिक तपासात त्यांचा गुदमरल्याने मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. घरातील सामान अस्ताव्यस्त होते आणि सोन्याचे दागिने गायब होते.
नातीच्या वर्तनामुळे पोलिसांना संशय
तपासादरम्यान नातीच्या वर्तनामुळे पोलिसांना संशय आला. आजोबांच्या मृत्यूनंतरही ती फारशी भावनिक प्रतिक्रिया देत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याचवेळी तिने शाळेत सुरू असलेल्या परीक्षेला उपस्थित राहण्याचा आग्रह धरला.
तिची सखोल चौकशी केल्यानंतर आणि तिच्या मोबाइल फोनची तपासणी केल्यानंतर कथित कटाचा उलगडा झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मोबाइलमध्ये आरोपी तरुणांनी हत्येचे दृश्य रेकॉर्ड करून नातीला पाठवल्याचे आढळले.
आरोपी तरुण पसार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्यात सहभागी असलेले अल्पवयीन आरोपी कोल्लम येथील आहेत. आरोपी मुले शनिवारी रात्री ट्रेनने अलाप्पुझात पोहोचले. त्यांनी घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश केल्याचा दावा केला जात आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी घरात मिरची पावडर टाकण्याचाही प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर सोन्याचे दागिने घेऊन ते तेथून निघून गेल्याचा संशय आहे.
या प्रकरणात नातीसह चार अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. सर्व आरोपी अल्पवयीन असल्याने प्रकरणातील पुढील कारवाई बाल न्याय कायद्या अंतर्गत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
