Kerala election result news: इतर राज्यांमध्ये फारसी समाधानकारक कामगिरी करु न शकणारा काँग्रेस केरळमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. १४० विधानसभा जागांच्या या राज्यात काँग्रेसने ६२ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसप्रणित यूडीएफ आघाडीने जवळपास १०० जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे केरळमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पण, इतर राज्यांत सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला केरळमध्ये चांगले यश मिळवणे कसे शक्य झाले? यासाठी विविध कारणे कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.
थरुर यांची नाराजी दूर करण्यात यश
केरळमधील विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या, यामध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले. याचेवळी काँग्रेसला विधानसभा निवडणुकांचा अंदाज आला होता, असे सांगितले जाते. काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी, फुटाफुटी आणि वादावर नियंत्रण मिळवणे पक्षासमोरील महत्वाचे आव्हान झाले होते. त्यामुळे पक्षात एकी निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले. काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या थिरुअनंतपुरम मतदारसंघातून या प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी थरुर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
प्रचार ते तिकीट वाटप
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांनी थरुर यांच्याबरोबर महत्वाची बैठक घेऊन विविध विषयांवर व्यापक चर्चा केली. यावेळी विविध मतभेद आणि समस्यांवर तोडगा काढण्यात आला. यानंतर थरुर यांची केरळच्या निवडणुकीसाठी सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले. आणि थरुर आणि प्रचारासाठी संपूर्ण केरळ पालथे घातले. तिकीट वाटपाची जबाबदारी मधुसूदन मिस्त्री यांच्यावर सोपविण्यात आली. मूळ गुजरातचे असणारे मिस्त्री यांनी अनुभवाच्या जोरावर तिकीट वाटपासाठी विशेष काळजी घातली. विद्यमान खासदारांना विधानसभेचे तिकीट दिले जाणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मिस्त्री यांनी घेतला. या निर्णयामुळे त्यांच्यावर पक्षातून जोरदार टीका देखील झाली.

नाराजी दूर करण्यात यश
मिस्त्री यांच्या तिकीट वाटपाच्या कडक धोरणामुळे नाराज झालेल्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसने सर्व प्रयत्न केले. यात के. सी वेणुगोपाल यांनी देखील महत्वाची भूमिका बजावली. यामुळे पक्षशिस्तीचा योग्य संदेश देण्यात काँग्रेसला यश आले. काँग्रेसने मुख्यमंत्री विजयन यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी देखील प्रचारात सहभाग नोंदवत केरळच्या जनतेला विविध आश्वासनं दिली. २५ लाखांपर्यंत आरोग्य विमाच्या आश्वासन देखील याचवेळी देण्यात आले. मुस्लिम लीगबरोबर केलेल्या युतीमुळे अल्पसंख्याक मतदारांचा पाठिंबा काँग्रेसला मिळाला. पक्षात केलेले महत्वाचे बदलांमुळे ख्रिश्चन मतदारांना आकर्षित करण्यात काँग्रेसला यश आले.
लोकसंख्याशास्त्रीय घटकाचा फायदा
काँग्रेस पक्षाचे तिन्ही संभाव्य मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार के. सी. वेणुगोपाल, व्ही. डी. सतीशन आणि रमेश चेन्नीथला हे नायर समाजाचे आहेत. या लोकसंख्याशास्त्रीय घटकामुळे काँग्रेसला निवडणुकीत फायदा झाला, असे मानले जाते. केरळमध्ये मुख्यमंत्री विजयन यांना इन्कम्बन्सीचा फटका बसल्याचे सांगितले जाते. दरम्यान, केरळमध्ये काँग्रेसने कोणतीही चूक केली नाही याचाच त्यांना निवडणुकीत फायदा झाल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगतात.
