थिरुअनंतपुरम : सत्ताविरोधी लाटेच्या जोरावर केरळमध्ये काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीने (यूडीएफ) १४० पैकी शंभरच्या आसपास जागा जिंकत परिवर्तन घडवले. त्यात एकट्या काँग्रेसला ६३ जागा मिळाल्या. तर डाव्या लोकशाही आघाडीतील (एलडीएफ) प्रमुख घटक असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला केवळ २६ जागांवर विजय मिळवता आला. दोन आघाड्यांच्या राजकारणात राज्यात स्थान निर्माण करू पाहणार्या भाजपला तीन जागांवर यश मिळाले.
राज्यातील सर्वच विभागातून यूडीएफला आघाडी मिळाली. के. करुणाकरन, उम्मन चंडी असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसल्याने राज्याच्या राजकारणात हे स्थित्यंतर मानले जाते.
विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी डाव्या आघाडीविरोधात प्रचाराची आघाडी सांभाळली होती. सतीशन हे उत्तर परावूर मतदारसंघातून विजयी झाले. त्यांचा हा सलग पाचवा विजय आहे. काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला हे हरिपाड या आपल्या पारंपरिक मतदारसंघातून विजयी झाले. काँग्रेसला २९ टक्के मते मिळाली. काँग्रेस आघाडीच्या यशात मित्र पक्ष असलेल्या इंडियन युनियन मुस्लीम लीगची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. त्यांना २२ जागांसह ११ टक्के मते प्राप्त झाली.
राज्यात डाव्या आघाडीविरोधात रोष होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना त्यांच्या धर्मदम मतदारसंघात विजयासाठी काँग्रेस उमेदवार व्ही. पी. अब्दुल रशीद यांनी झुंजवले. १९ हजार मतांच्या फरकाने विजयन यांनी विजय साकारला.
भाजपचे पुनरागमन
राज्यात तिसरा पर्याय ठरू पाहणार्या भारतीय जनता पक्षाने यंदा काही जागांवर चांगली लढत दिली. प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर हे नेमम मतदारसंघातून विजयी झाले. मात्र त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही. शिवनकुट्टी यांनी जोरदार लढत दिली. माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते व्ही.मुरलीधरन यांनी कझाकोट्टम मतदारसंघात ४२८ मतांनी विजय मिळवला. राज्याच्या राजकारणात त्यांचे हे पुनरागमन मानले जाते. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत मुरलीधरन पराभूत झाले होते. भाजपला विधानसभा निवडणुकीत १२ टक्के मते मिळाली.
तेरा मंत्री पराभूत : केरळमध्ये २१ पैकी १३ मंत्री पराभूत झाले. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याखेरीज पी.ए.मोहम्मद रियास, के. राजन, जी.आर.अनिल, के.एन.बालगोपाल, पी.प्रसाद आणि सजी चेरियन हे डाव्या आघाडीतील मंत्री विजयी झाले. डाव्या आघाडीचे समन्वयक टी.आर.रामकृष्णन यांनाही पराभवाचा धक्का बसला.
व्ही.डी.सतीशन….कुशल रणनीतीकार
* काँग्रेस आघाडीला यश मिळाले नाही तर राजकारणातून निवृत्त होईल अशी घोषणा विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी केली होती. यातून राज्यात काँग्रेस आघाडीला राज्यात सत्ता मिळणार असा आत्मविश्वास त्यांना होता.
* काँग्रेसचा २०२१ च्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्याच काळात पक्षनेते राहुल गांधी यांनी ६१ वर्षीय सतीशन यांच्यावर विश्वास टाकला. त्या वेळी तो निर्णय धोकादायक वाटत होता. मात्र आता पक्षाचे यश पाहता सतीशन हे नेतृत्वाने टाकलेल्या विश्वासला पात्र ठरल्याचे दिसून येते.
* स्थानिक समस्यांवर भर देणे त्याचबरोबर संघटना भक्कम करण्याला बळ या धोरणानुसार त्यांनी काम केले. विद्यार्थी राजकारणातून पुढे आलेले सतीशन हे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले जातात.
* काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयूआयचे पदाधिकारी असताना सतीशन यांनी पक्षाच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली. माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख. पर्यावरणाच्या मुद्द्यावरही सातत्याने आवाज उठविण्यात ते आघाडीवर असतात. * डाव्या आघाडीच्या विरोधात गेली पाच वर्षे सतीशन यांनी संघर्ष केला. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी हा चर्चेचा विषय होता. स्पष्ट आणि रोखठोक भूमिकेसाठी ते ओळखले जातात.
