पीटीआय, तिरुवनंतपुरम

केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मंगळवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. गरजू महिलांना आणि ७० वर्षांवरील नागरिकांना आर्थिक मदत, गरीब कुटुंबांना वार्षिक दोन मोफत एलपीजी सिलिंडर यासह राज्यात एम्स उभारण्याचे आश्वासन या माध्यमातून देण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला.

या वेळी नवीन यांनी केरळमधील डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) सरकारांवर टीका केली. राज्यात आर्थिक स्थिरता नाही, औद्योगिक वाढ कमी आहे तसेच आर्थिक गैरव्यवस्थापनाला हेच सरकार जबाबदार असल्याचे ते म्हणाले. तिरुवनंतपुरम आणि कन्नूरला जोडणारा उच्च वेग रेल्वे प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. यासह प्रत्येक घराला २० हजार लिटर मोफत पाणी देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

बीपीएल आणि गरीब कुटुंबांतील प्रत्येक महिलेला ‘भक्ष्य आरोग्य सुरक्षा कार्ड’ दिले जाईल. त्यात महिन्याला २,५०० रुपयांची रक्कम रिचार्ज केली जाईल. ही रक्कम औषधालये आणि किराणा दुकानांमध्ये त्यांना वापरता येणार आहे. गरीब कुटुंबातील महिलाप्रमुख, विधवा आणि ७० वर्षांवरील नागरिकांना दरमहा ३,००० रुपयांची पेन्शन देण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. शबरीमाला मंदिर, गुरुवायूर मंदिर यांसह सर्व धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्याचे आणि देवस्वम बोर्डात पारदर्शकता आणण्याचेही आश्वासन देण्यात आले.

शबरीमाला प्रकरणी राहुल गांधींची मोदींवर टीका

कन्नूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर ठिकाणी धर्म, मंदिर आणि देव याबद्दल बोलतात, पण केरळमध्ये येऊन शबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरीबाबत का बोलत नाहीत? असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. कन्नूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यूडीएफ आणि काँग्रेसवर नियंत्रण ठेवता येत नाही म्हणून भाजपला केरळमध्ये माकपची सत्ता हवी असल्याच्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. दरम्यान, कन्नूर आणि कोझिकोड जिल्ह्यांत तीन निवडणूक सभांना उपस्थित राहिल्यानंतर राहुल गांधींनी कोयलंडीमध्ये एका रोडशोमध्ये सहभाग घेतला.

कोट भारताला आता कोणाकडूनही तेल खरेदीसाठी अमेरिकेची परवानगी घ्यावी लागते. रशिया, इराण किंवा इराककडूनही परवानगीशिवाय तेल खरेदी करता येत नाही. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते