Vande Mataram controversy: संपूर्ण वंदे मातरम गाण्यावरून केरळमध्ये वादाला तोंड फुटले आहे. केरळ विधानसभेत ‘वंदे मातरम’ गायनावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, केरळचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली. संपूर्ण वंदे मातरम गाणे हा आरएसएसच्या अजेंडाचा भाग आहे, असा आरोप पिनारायी विजयन यांनी केला. ​संपूर्ण वंदे मातरम गाण्याची किंवा फक्त पहिली दोन कडवी गायली जातात तेव्हा उभे राहण्याचीही गरज नाही, असेही विजयन म्हणाले.

नेमकं काय म्हणाले पिनारायी विजयन?

“वंदे मातरम संपूर्ण गाण्याची गरज नाही, हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. वंदे मातरमची फक्त पहिली दोन कडवी गायली जात असताना उभे राहण्याचीही आवश्यकता नाही. वंदे मातरमचे पूर्ण गाणे हा आरएसएसच्या अजेंडाचा भाग आहे. शपथविधीवेळी संपूर्ण गाणे गायले गेले, जे व्हायला नको होते. त्यानंतर सरकारने कठोर निर्णय घेतली असल्याचे दिसते. हीच भूमिका घेतली पाहिजे,” असे पिनारायी विजयन म्हणाले.

वाद काय? भाजपाने काय आरोप केलाय?

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या अभिभाषणादरम्यान केरळ विधानसभेत वंदे मातरम संपूर्ण न गायल्याने राष्ट्रीय गाण्याचा अपमान केल्याचा आरोप भाजपाने केला. यानंतर विजयन यांनी याप्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट केली. राज्यपाल उपस्थित असलेल्या कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’चे पूर्ण सादर करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश आहेत, परंतु केरळ विधानसभेने त्याचे पालन केले नाही, असा आरोप ​भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कझाकुट्टमचे आमदार व्ही. मुरलीधरन यांनी केला आहे. हा लोकभवन आणि राज्यपालांचा अपमान आहे. १५० व्या वर्धापनदिनानिमित्त वंदे मातरमचा अनादर करण्यात आला,” असे मुरलीधरन यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

सीपीएमने स्पष्ट केली भूमिका

​१८९६ च्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात हे गाणे पहिल्यांदा गायले गेले होते, याकडे लक्ष वेधत मुरलीधरन यांनी ‘वंदे मातरम’वरील काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आम्ही याचा तीव्र निषेध करतो”, असेही मुरलीधरन म्हणाले. “वंदे मातरममधील गाण्याचे काही भाग विशिष्ट धार्मिक श्रद्धांचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचा अधिकृत सरकारी समारंभांमध्ये समावेश करणे भारताच्या धर्मनिरपेक्ष परंपरांशी सुसंगत नाही”, अशी भूमिका सीपीएमने मांडली आहे.