BJP Candidate Sonia Gandhi : केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील मुन्नार पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकीची देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. या चर्चाचं कारणही तसंच आहे. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेल्या एका उमेदवार महिलेचं नाव सोनिया गांधी असं आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावासारखं नाव असलेल्या उमेदवाराला भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुन्नारच्या भाजपाच्या उमेदवार सोनिया गांधी यांची संपूर्ण देशभरात चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या उमेदवार सोनिया गांधी यांचा जन्म हा काँग्रेस पक्षाचा मजबूत राजकीय वारसा असलेल्या कुटुंबात झालेला आहे. पण आता त्या भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. या संदर्भातील वृत्त टाईम्स नाऊने दिलं आहे.

भाजपाच्या सोनिया गांधी यांचे वडील दिवंगत दुराई राज हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि नल्लाथन्नी कल्लरमधील पक्षाचा सक्रिय चेहरा होते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल त्यांना खूप आदर होता. त्यामुळे दुराई राज यांनी त्यांच्या मुलीचं नाव हे सोनिया गांधी असं ठेवलं होतं. मात्र, पुढे सोनिया गांधी यांच्या लग्नानंतर राजकीय समीकरणही बदलली. या सोनिया गांधी यांचे पती सुभाष हे भाजपाचे नेते आणि पंचायत महासचिव आहेत.

सोनिया गांधी यांचे पती सुभाष भाजपात असल्यामुळे आता त्यांनी देखील भाजपाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर सोनिया गांधी या पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. तसेच त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या मंजुळा रमेश आणि सीपीएमच्या वलारमती निवडणुकीच्या मैदानात आहेत. या निवडणुकीसाठी ९ आणि ११ डिसेंबर रोजी मतदान होणार असून १३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार असलं तरी त्याआधीच संपूर्ण देशात भाजपाच्या सोनिया गांधी यांची मोठी चर्चा रंगली आहे.