Anti-Rahul Gandhi posters in Wayanad: कोण होणार केरळचा नवा मुख्यमंत्री? दहा दिवसानंतर देखील या चर्चांना काही केल्या पूर्णविराम मिळताना दिसत नाही. मुख्यमंत्री निवडीवरुन काँग्रेसच्या सुरु असलेल्या बैठकांमधून ठोस निर्णय होत नसल्याने पक्षातील नेत्यांसह राज्यातील नागरिकांनी आता संताप व्यक्त करण्यास सुरुवात केलीय. एवढेच नव्हे तर राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघात देखील धुसफूस सुरु झाली असून, गांधींना इशारा देणारे पोस्टर शहरात झळकू लागले आहेत.

राहुल, प्रियांका गांधींविरोधात झळकले पोस्टर

“मिस्टर राहुल आणि प्रियांका, वायनाड विसरा. तुम्ही पुन्हा येथून विजयी होणार नाही”, असा संदेश देणारे एक पोस्टर वायनाडमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाबाहेर झळकले आहे. याशिवाय आणखी काही पोस्टर समोर आली असून, यात गांधींना इशाराच देण्यात आला आहे. “मिस्टर राहुल, के. सी कदाचित तुमच्या बॅगा उचलत असतील पण, केरळची जनता तुम्हाला माफ करणार नाही”, अशा स्पष्ट संदेश लिहलेले आणखी एक पोस्टर इथं झळकले आहे. दुसऱ्या एका पोस्टरवर “आरजी, पीजी हा इशारा नाही. या चुकीसाठी केरळ तुम्हाला माफ करणार नाही”, असा संदेश लिहण्यात आला आहे.

अमेठीची करुन दिली आठवण

केरळमध्ये काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. पण, राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यावरुन नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येते. राहुल गांधी यांना २०१९ मध्ये अमेठी मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता. एक पोस्टरमध्ये राहुल गांधी यांना २०१९ ची आठवण करुन देताना “वायनाड पुढची अमेठी” असू शकते असा इशारा देण्यात आला आहे. तसेच, “केरळ राहुल आणि प्रियांका गांधी यांचे मूर्खपणाचे निर्णय मान्य करणार नाही”, असाही संदेश लिहण्यात आला आहे.

सत्तास्थापनेचा तिढा

केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित करण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून केरळसह दिल्लीत खलबतं सुरु आहेत. पण, अद्याप एका नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही, त्यामुळे राज्यात कमालीची नाराजी पाहायला मिळत आहे. यावरुन केरळ काँग्रेसमध्ये देखील मोठी उलथापालथ सुरु आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीसाठी इथं के.सी. वेणुगोपाल, व्ही.डी. सतीशन आणि रमेश चेन्नीथला असे तीन गट उदयास आले आहेत. योग्य उमेदवारावर विचारविनिमय करण्यासाठी राहुल गांधी यांनी मंगळवारी दिल्लीत राज्य काँग्रेस कमिटीबरोबर बैठक घेतली. दरम्यान, अद्याप एक नाव निश्चित करण्यात आलेले नाही.

मतमतांतरे

मंत्रिपदाचे वाटप आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा यावरुन आघाडीत मतमतांतरे असल्याचे दिसून येत आहे. आघाडीतील विविध गट मुंख्यमंत्रीपदासाठी विविध नावांचा पर्याय सुचवत आहेत. यामुळे अंतिम निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांमध्येही चुकीचा संदेश जात असल्याची भावना बोलून दाखवली जात आहे. भाजपा आणि एलडीएफकडून देखील काँग्रेसप्रणित युडीएफ आघाडीवर टीका केली जात आहे.