Kerala Congress Controversy Viral Video shows the moment Cherian Philip tried to hug MLA Bindu Krishna : तिरुवनंतपुरम येथील केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (KPCC) मुख्यालयातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चेरियन फिलिप हे कोल्लमच्या नवनिर्वाचित आमदार बिंदू कृष्णा यांना मिठी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहेत. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीदरम्यान घडलेल्या या प्रकारावेळी बिंदू कृष्णा या त्यांना रोखताना दिसून आल्या तसेच यांच्या चेहऱ्यावर अनिच्छा स्पष्टपणे पाहायला मिळाली.

विशेष बाब म्हणजे, पक्षाचे नेते आणि पत्रकार उपस्थित असताना हा प्रकार घडला. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे काँग्रेस पक्ष आणि चेरियन फिलिप यांच्यावर चहुबाजूंनी टीका केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

व्हिडीओमध्ये ४८ वर्षीय बिंदू कृष्णा या घटनास्थळावर येताना आणि पक्ष कार्यालयाच्या प्रवेशद्वाराकडे जाण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधींना अभिवादन करताना दिसत आहेत. पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेल्या बिंदू कृष्णा प्रथम एका कार्यकर्त्याशी हस्तांदोलन करतात आणि त्यानंतर ७१ वर्षीय चेरियन फिलिप हे त्यांच्याकडे येत असल्याचे दिसते.

बिंदू कृष्णा यांनी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केल्याचे दिसून येते, मात्र फिलिप हे त्याऐवजी आलिंगन देण्यासाठी पेठे सरसावताना दिसतात. व्हिडीओमध्ये फिलिप हे त्यांना मिठी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

या व्हिडीओमध्ये बिंदू कृष्णा या काहीशा अस्वस्थ झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. फिलिप मिठी मारण्याचा प्रयत्न करत असताना त्या विरोध करताना आणि स्वतःपासून लांब ढकलताना दिसत आहेत. अखेर बिंदू कृष्णा यांनी हात जोडले आणि त्या तिथून पुढे निघून गेल्या.

या व्हिडीओमध्ये येथे उपस्थित काही पत्रकार आणि पक्षाचे कार्यकर्ते हसताना दिसून येत आहेत, यावर देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली जात आहे.

सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी फिलिप यांच्यावर बिंदू कृष्णा यांना त्यांच्या वर्तवणुकीमुळे स्पष्टपणे जाणवणाऱ्या अस्वस्थतेकडे दुर्लक्ष केल्याचा केल्याचा आरोप केला आहे. राजकीय क्षेत्रात तुम्ही वरिष्ठ असलात किंवा सार्वजनिक ठिकाण असले तरी समोरच्या व्यक्तीनेआपली अनिच्छा व्यक्त केली की त्यांच्या वैयक्तिक सीमांचा कोणत्याही परिस्थितीत आदर केलाच पाहिजे, असे अनेक युजर्सनी म्हटले आहे.

दरम्यान अद्याप चेरियन फिलिप किंवा बिंदू कृष्णा यांपैकी कोणीही या घटनेबाबत अधिकृतपणे निवेदन जारी केलेले नाही.