Kerala Congress Leader CP Matthew: ऐन विधानसभा निवडणुकीत केरळमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेत्याने एका प्रचार सभेत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महिलांच्या माध्यमातून विरोधकांविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करा, असे अजब आवाहन इडुक्की जिल्हा काँग्रेस समितीचे (DCC) अध्यक्ष सी. पी. मॅथ्यू यांनी केले आहे. मॅथ्यू यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

मॅथ्यू नक्की काय म्हणाले?

युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) चे उमेदवार रॉय के पॉलोस यांच्यासाठी वाझथोप येथे प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. मॅथ्यू यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. “महिला नेत्यांनी स्वत:ची कपडे फाडून विरोधी उमेदवाराविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करा. यामुळे विरोधी उमेदवाराच्या विरोधात मजबूत खटला उभा राहण्यासाठी मदत होते”, असे मॅथ्यू या प्रचार सभेत बोलतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

SC/ST बाबतही वक्तव्य

मॅथ्यू यांनी या प्रचारसभेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यातील तरतुदींचा वापर करून अनुसूचित जाती/जमाती समुदायातील महिलांना सामील करून घेण्याबद्दलही भाष्य केल्याचा आरोप केला जात आहे. अशा प्रकरणं कायदेशीररित्या अधिक गंभीर होऊ शकतात असे संकेत त्यांनी भाषणात दिले. यावरुन मॅथ्यू यांच्याविरोधात जोरदार टीका केली जात असून, त्यांच्या भाषणाची क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागली आहे.

सत्ताधारी सीपीआयकडून टीका

मॅथ्यू यांनी भरसभेत हे वक्तव्य केले त्यावेळी मंचावर केरळ काँग्रेसचे उपाध्यक्ष जेसन जोसेफ यांच्यासह ज्येष्ठ नेते मंचावर उपस्थित होते. पण, त्यांनी याविषयावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, सत्ताधाी सीपीआय (एम) ने मॅथ्यू यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध केला आहे. काँग्रेसकडून उमेदवारांना बेकायदेशीर पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले जात असल्याचा आरोप सीपीआयने केला. काँग्रेस नेते मॅथ्यू यांचा वादाचा इतिहास जुना आहे, यापूर्वी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्याला सार्वजनिक कार्यक्रमात मारहाण केली होती.