मासिकपाळी अपवित्र असून महिलांनी त्या दिवसांमध्ये मंदिरात जाऊ नये असे वादग्रस्त विधान केरळमधील काँग्रेस नेते एम एम हसन यांनी केले आहे. हसन यांच्या विधानावर महिला संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

केरळमधील काँग्रेस नेते एम एम हसन हे एका कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात हसन म्हणाले, मासिक पाळीदरम्यान महिलांना मंदिर, चर्च किंवा मशिदीमध्ये प्रवेश द्यायला नको. या कालावधीत महिलांचे शरीर अशूद्ध असते. त्यामुळे अशा स्थितीत त्यांना धार्मिक स्थळांवर प्रवेश नकोच असे त्यांनी सांगितले. यामागचे वैज्ञानिक कारण मात्र त्यांनी दिले नाही. मुस्लिम महिला मासिक पाळीदरम्यान उपवास करत नाही असा दावाही त्यांनी केला.

काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्या दबावामुळे काँग्रेसने राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार एम एम हसन यांच्याकडे सोपवला आहे. वी एम सुधीरन आजारी पडल्यापासून केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद रिक्त होते. हसन यांच्याकडे या पदाचा हंगामी कार्यभार आहे. पदभार स्वीकारताच हसन यांनी हे विधान केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये मासिकपाळीदरम्यान महिलांना मंदिरात प्रवेश देण्याची चर्चा नेहमीच वादग्रस्त ठरली आहे. यापूर्वी केरळमधील शबरीमाला देवस्थान या मंदिरात मासिक पाळी सुरू असणाऱ्या १२ ते ५० या वयोगटातील स्त्रियांना प्रवेश बंदी करण्याच्या निर्णयावरुन वाद झाला होता.