ओडिशात कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर शेकडो प्रवासी जखमी झाले. यानंतर विरोधकांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आता काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रेल्वे अपघाताची पाहणी करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट करत मोदींवर दिवसातून पाचवेळा ड्रेस बदलल्याचा आरोप केला आहे. केरळ काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत ट्वीट करण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसने ट्वीट केलेल्या व्हिडीओत नेमकं काय?

काँग्रेसने ट्वीट केलेल्या एका व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत ओडिशा रेल्वे अपघाताची माहिती घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्वीट करताना केरळ काँग्रेसने म्हटलं, “सध्याच्या परिस्थितीकडे पाहिलं, तर आपल्याला असा पंतप्रधान मिळाला आहे जो दिवसातून पाचवेळा ड्रेस बदलतो.”

“तिनदा ड्रेस बदलला म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलेला”

या ट्वीट मालिकेत काँग्रेसने इतिहासाची उजळणी करत नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देणाऱ्या काँग्रेस नेत्यांची माहिती दिली. काँग्रेसने म्हटलं, “२००८ मध्ये मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी दिवसभरात तिनदा ड्रेस बदलला म्हणून त्यांच्यावर टीका झाली. यानंतर शिवराज पाटलांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.”

“पुतण्यावर रेल्वे बढतीतील घोटाळ्याच्या आरोपानंतर राजीनामा”

“२०१३ मध्ये रेल्वेमंत्री पवन कुमार बंसल यांच्या पुतण्यावर रेल्वे बोर्डाच्या बढती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला. त्यानंतर पवन कुमार बंसल यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सीबीआयने केलेल्या तपासात या आरोपांमध्ये तथ्य सापडलं नाही, तरीही त्यांनी आपल्या पदाचा त्याग केला,” असंही काँग्रेसने नमूद केलं.

“…तेव्हा लालबहादूर शास्त्रींनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला”

यावेळी काँग्रेसने लालबहादूर शास्त्रींचंही उदाहरण दिलं. ते म्हणाले, “१९५६ मध्ये तामिळनाडूमधील रेल्वे अपघातानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला. त्यांनी या अपघातातील १४२ मृत्यूंची नैतिक जबाबदारी स्वीकारत हा राजीनाम्याचा निर्णय घेतला.”

हेही वाचा : ओडिशातील भीषण अपघातावर शरद पवारांची प्रतिक्रिया, लालबहादूर शास्त्रींचा उल्लेख करत म्हणाले, “राजीनामा…”

“आजची परिस्थिती पाहिली, तर आपल्याला असा पंतप्रधान मिळाला आहे जो दिवसातून पाचवेळा ड्रेस बदलतो. ओडिशात भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात भीषण रेल्वे अपघात झाला. यानंतरही रेल्वेमंत्री आणि पंतप्रधान नेहमीप्रमाणे नाटक करत आहेत. सत्तेत असणाऱ्यांचं बेजबाबदार वर्तन पाहणं त्रासदायक आहे. देशाच्या विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी नेतृत्व आणि पारदर्शकता महत्त्वाची आहे. मात्र, सध्या त्याची कमतरता काळजीत टाकणारी आहे,” असंही काँग्रेसने म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala congress tweet video of pm narendra modi over odisha train accident pbs
First published on: 04-06-2023 at 18:30 IST