Kerala Election Results 2026 UDF Victory: केरळ विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने (यूडीएफ) दणदणीत विजय मिळवला आहे. ४ मे रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठवड्याभराहून अधिक काळ लोटला आहे. पण, काँग्रेस नेतृत्वाने अद्याप काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्याचे नाव जाहीर केलेले नाही. यामुळे आघाडीतील मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे दिल्लीत खलबतं सुरू आहेत.

हायकमांडकडून दिल्लीचे आमंत्रण

समोर आलेल्या माहितीनुसार, सरकार स्थापनेसाठी काँग्रेसकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. यासाठी दिल्लीत हायकमांडकडून बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. ताज्या घडामोडीनुसार, सरकार स्थापना आणि मुख्यमंत्रिपदाच्या निवडीबाबत मत जाणून घेण्यासाठी काँग्रेसच्या हायकमांडने केरळमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नवनिर्वाचित आमदार, तसेच केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष के. मुरलीधरन यांना मंगळवारी दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

लवकर निर्णयासाठी काँग्रेसवर दबाव

के. मुरलीधरन यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सत्तास्थापनेबाबत भाष्य केले. “केरळच्या मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय पुढील ४८ तासांत अपेक्षित आहे,” असे मुरलीधरन म्हणाले. मुरलीधरन यांच्यासह या बैठकीला उपाध्यक्ष एपी अनिल कुमार, शफी पारंबिल आणि पीसी विष्णुनाध यांच्यासह ज्येष्ठ नेते थिरुवंचूर राधाकृष्णन यांना दिल्लीत चर्चेसाठी बोलावले आहे. त्यामुळे केरळच्या मुख्यमंत्रीबदाबाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्याच्या केरळ विधानसभेचा कार्यकाळ २३ मे रोजी संपणार आहे. यामुळे लवकरात लवकर निर्णय घेण्याचा काँग्रेस नेतृत्वावर दबाव वाढत आहे.

तीन नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत

केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सध्या काँग्रेसच्या तीन ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
१) रमेश चेन्नीथला,
२) केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव के. सी. वेणुगोपाल
३) विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन
समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या हायकमांडने शनिवारी नवी दिल्लीत या तिन्ही नेत्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. सूत्रांनुसार, काँग्रेसचे बहुसंख्य आमदार मुख्यमंत्रीपदासाठी वेणुगोपाल यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितले जाते, तर सतीशन यांची लोकामध्ये अधिक लोकप्रिय असल्याने त्यांच्याही नावाचा विचार प्रामुख्याने केला जात आहे.

यूडीएफचा विजय

१४० जागा असलेल्या केरळच्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त लोकशाही आघाडीने (यूडीएफ) १०२ जागा जिंकल्या आहेत. आघाडीमध्ये काँग्रेसला ६३ जागा मिळाल्या असून, इंडियन युनियन मुस्लिम लीगने (आययूएमएल) २२ जागा जिंकल्या आहेत. केरळ काँग्रेसने (केईसी) आठ जागा आणि रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टीने (आरएसपी) तीन जागांवर विजय मिळवला. आघाडीमुळे मित्रपक्षांची भूमिका आणि सत्तावाटप याबाबत दिल्लीत चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.