Kerala Floods Rescue Hero R Rajesh Life Jacket Sacrifice: निसर्गसंपन्न असलेल्या केरळ राज्याला देवभूमी म्हटले जाते. मात्र निसर्गाबरोबरच त्याचे रौद्ररुपही स्वीकारावे लागते. केरळमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत आहेत. २०१८ चा पूर, वायनाडमध्ये झालेले भूस्खलन आणि यावर्षी आलेले पुराचे संकट. यामुळे केरळमध्ये एकामागोमाग आपत्ती येत आहेत. कन्नूर जिल्ह्यातील मींथुल्ली येथे करिआंगोडे नदीला पूर आला होता. या पुरात ६१ वर्षीय वृद्धाला वाचवताना स्वयंसेवक आणि जलतरण प्रशिक्षक आर. राजेश यांचा मृत्यू झाला आहे.

१ ऑगस्ट रोजी आर. राजेश नदीत वाहून गेले होते. मंगळवारी त्यांचा मृतदेह आढळून आला. तिरुवनंतपुरममधील कल्लियूरचे रहिवासी असलेल्या आर. राजेश यांनी बेनी नावाच्या वृद्धाला पुरातून वाचविल्यानंतर त्यांना किनाऱ्याकडे नेत असताना ते स्वतः वाहून गेले. यावेळी त्यांनी आपले लाईफ जॅकेट सदर वृद्धाला दिले होते.

आर. राजेश कोण होते?

आर. राजेश हे स्विमिंग आणि रॅपलिंगचे प्रशिक्षक होते. त्यांनी गेल्या काही काळात केरळमध्ये आलेल्या प्रत्येक मोठ्या नैसर्गिक संकटावेळी बचावकार्यात सहभाग घेतला होता. २०१८ साली आलेला पूर आणि २०२४ च्या वायनाडमधील भूस्खलनावेळी ते बचावकार्यात सामील झाले होते. यावर्षीच्या पुरातही ते मदतकार्यासाठी धावून आले.

आर. राजेश यांच्या पश्चात पत्नी लक्ष्मी, अर्शन आणि अभिषेक हे दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे.

करिआंगोडे नदीवर काय घडले?

केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन आणि भाजपा आमदार राजीव चंद्रशेखर यांनी एक्स पोस्टवर या घटनेची माहिती दिली आहे. आर. राजेश यांनी कन्नूरमधील पुलिंगोमजवळ पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या बेनी (वय ६१) यांना वाचवले. त्यांना सुरक्षित ठिकाणी आणल्यानंतर आर. राजेश यांनी स्वतःचे लाईफ जॅकेट त्यांना घालायला दिले. बेनी यांना किनाऱ्यावर परत आणत असताना राजेश पाण्याच्या प्रवाहात अडकले आणि ते बाहेर येऊ शकले नाहीत.

मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन यांनी बुधवारी राजेश यांना श्रद्धांजली वाहिली. “कन्नूरच्या पुलिंगोममध्ये पुराच्या पाण्यात बुडण्यापूर्वी राजेश यांनी एका वृद्धाला वाचविण्यासाठी स्वतःचे लाईफ जॅकेट दिले. त्यांचे बलिदान आणि मानवतेवरील निस्वार्थ प्रेम कायम स्मरण केले जाईल. त्यांचे कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. राजेश अमर रहे”, अशी पोस्ट सतीशन यांनी लिहिली.

नेमम मतदारसंघाचे आमदार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनीही आर. राजेश यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. तसेच केरळचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते पिनराई विजयन यांनीही आर. राजेश यांना श्रद्धांजली व्यक्त केली.