Kerala floods. पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्यासाठी कधी हाच पाऊस इतका धोकादायक ठरु शकतो याचा प्रत्यय सध्या केरळमध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून येथे अतिवृष्टीमुळे महापूर आला असून, जवळपास संपूर्ण राज्य यामुळे प्रभावित झालं आहे. आतापर्यंत या पुरात अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता अनेकांनीच पूरग्रस्तांची मदत करण्यासाठी म्हणून आपला हात पुढे केला आहे. सध्या सोशल मीडियावरही अनेकांनीच मदतनिधी उभा करण्यासाठी नेमका विविध मार्गांचा अवलंब केला आहे.

एकिकडे केरळमध्ये परिस्थिती सुधारण्याचं नाव घेत नाहीये. असं असलं तरीही अनेकांनीच आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करुन पूरग्रस्तांसाठी मदत केल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर सध्या केरळच्या अशाच दोन आयएएस अधिकाऱ्यांचे फोटो सर्वांचं लक्ष वेधत आहेत. ज्यामध्ये ते दोन अधिकारी बचाव कार्यात मदत करत असून, आपल्या पदाची जबाबदारी जाणत रुबाब बाजूला सारुन चक्क खांद्यावरुन तांदळाची पोती वाहताना दिसत आहेत.

केरळचे अन्नसुरक्षा अधिकारी एम.जी. राजमनीकयम, आणि वायनाडचे उप जिल्हाधिकारी एन.एस.के. उमेश अशी या दोन अधिकाऱ्यांची नावं असून, त्यांच्या कामाचीच सर्वदूर चर्चा सुरु आहे.

वाचा : निपाहमुळे जीव गमावणाऱ्या नर्सच्या पतीची माणूसकी, पहिला पगार पूरग्रस्तांना

मोठ्या पदावर असल्यामुळे इतरांना फक्त आदेश देण्यापुरताच स्वत:ला सीमित न ठेवता त्यांनी मदत आणि बचावकार्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहकार्य केल्यामुळे सोश मीडियावर अनेकांनीच त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. खऱ्या अर्थाने या दोन अधिकाऱ्यांनी आपल्या कामाने आदर्श घालून दिला आहे, असंही म्हणत नेटकऱ्यांनी त्यांची प्रशंसा केली आहे.