तिरुवनंतपुरम : केरळ सरकार करोना रुग्णांची दैनंदिन माहिती केंद्राला देत नसल्याचे वृत्त केरळ सरकारने मंगळवारी फेटाळले. हे आरोप खोटे असून, राष्ट्रीय स्तरावर यासंदर्भात चाललेला अपप्रचार निषेधार्ह असल्याची टीका केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी केली.

केरळ सरकार करोना रुग्णांची आकडेवारीची माहिती दर पाच दिवसांनी देते. त्यामुळे नव्या करोना रुग्णांची संख्या, मृत्यू आणि संक्रमण दराविषयीच्या भारताच्या करोना साथविषयक मुख्य निरीक्षण निर्देशांकावर परिणाम होत आहे. त्यामुळे केंद्राने केरळ सरकारला दैनंदिन अद्ययावत आकडेवारी देण्यास सांगितले आहे.

मात्र, या संदर्भात आरोग्यमंत्री जॉर्ज यांनी सांगितले, की केरळने दररोज करोनाविषयक आकडेवारी केंद्राला विहित स्वरुपात कळवली आहे. त्यात आतापर्यंत कुठलाही खंड पडलेला नाही. या संदर्भातील संगणकीय पुरावेच असल्याने ते कुणालाही नाकारता येणारच नाहीत.

केंद्रीय सहसचिवांनी या संदर्भात पाठवलेल्या पत्राची प्रत राज्याच्या आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांपर्यंत पोहोचण्याआधीच प्रसारमाध्यमांकडे गेल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.