ईदसाठी करोना निर्बंध शिथिल करणे अयोग्य : सर्वोच्च न्यायालयाचे मत
केरळ सरकारने त्यांच्या राज्यात रुग्णांचा संसर्ग दर अधिक असताना बकरी ईद निमित्त नियम शिथिल करणे हे अनपेक्षित असून जगण्याचा अधिकार हा त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा असला पाहिजे. काही व्यापाऱ्यानी दबाव आणल्याने नियमात शिथिलता देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अयोग्य आहे, असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत.

जगण्याच्या अधिकाराला महत्त्व असून त्याकडे राज्य सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे, असा आदेश देऊन न्यायालयाने म्हटले आहे की, जर नियम शिथिल केल्याने केरळात करोनाचा प्रसार आणखी वाढला व कुणी ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले तर आम्ही केरळ सरकारवर कारवाई करू, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सरकार व्यापाऱ्याच्या दबाव गटापुढे झुकले असून त्यातून राज्यातील कारभार कसा बेदरकारपणे चालला आहे हेच दिसून येते. व्यापाऱ्यानी याबाबत काही आश्वाासने दिली असली तरी सरकारने घेतलेल्या निर्णयातून लोकांच्या व न्यायालयाच्या मनात सरकारविषयी विश्वाासाची भावना निर्माण होणार नाही, असे न्या. आर. एफ. नरीमन व न्या. बी.आर गवई यांनी सांगितले. आम्ही केरळ सरकारला असा आदेश देत आहोत की, जीवन जगण्याचा अधिकार अनुच्छेद २१ अन्वये राज्यघटनेने दिला आहे, असे न्यायालय म्हणाले.   केरळात बकरी ईद निमित्त सरकारने नियम शिथिल केल्याबाबतच्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी केली.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात वृत्तपत्रांतील बातम्यांच्या आधारे स्वतङ्महून दखल घेऊन उत्तर प्रदेशातील कावड यात्रा घेण्याच्या तेथील राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता. कावड यात्रेमुळे करोना पसरण्याचा धोका असल्याचे न्यायालयाने म्हटले होते, यावर केंद्र सरकार व राज्य सरकारला नोटिस पाठवली होती. तुम्ही यात्रा रद्द करणार नसाल तर आम्ही करू असेही सूचित केले होते.

केरळ सरकारने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, व्यापाऱ्यानी काही वस्तूंचा बकरी ईदच्या निमित्ताने साठा केला आहे. तो वाया जाईल. पण न्यायालयाने त्यावर म्हटले आहे की, केरळ ड प्रवर्गात असून तेथे संसर्गाचा दर अधिक आहे. त्यामुळे त्या राज्याने जीवित रक्षणाऐवजी कुणाच्या दबावाखाली येऊन नियम शिथिल करणे योग्य नाही. प्रतिज्ञापत्रात तेथील राज्य सरकारची बेफिकीरी समोर आली आहे.

देशभरात ३० हजार नवे रुग्ण, ३७४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशभरात गेल्या चोवीस तासांत ३० हजार ९३ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले तर ३७४ जणांचा मृत्यू झाला. गेल्या १२५ दिवसांतील ही सर्वात कमी रुग्ण नोंद असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केले.

आतापर्यंत देशभरात ३ कोटी ११ लाख ७४ हजार ३२२ रुग्णांची नोंद झाली असून ४ लाख १४ हजार ४८२ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांची संख्या १.३० टक्के इतकी आहे. तर करोनामुक्त होण्याची टक्केवारी ९७.३७ इतकी आहे. गेल्या २४ तासांत १७ लाख ९२ हजार ३३६ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ४४ कोटी ७३ लाख ४१ हजार १३३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या १५ हजार ५३५ इतकी असून आतापर्यंत ३ कोटी ३ लाख ५३ हजार ७१० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

देशातील रुग्णवाढीचा दर १.६८ टक्के असून तो सलग २९ दिवसांपासून ३ टक्क्यांहून कमी आहे. आतापर्यंत देशातील ४१ कोटी १८ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.