Arif Mohammed Khan : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी गुरुवारी (५ डिसेंबर २०२४) हरियाणातील कुरुक्षेत्र विद्यापीठात ९ व्या आंतरराष्ट्रीय गीता परिषदेला संबोधित केलं. या आंतरराष्ट्रीय गीता परिषदेत हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आणि उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंह यांनी देखील सहभाग घेतला होता. मात्र, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी या गीता परिषदेला संबोधित करताना भगवद्गीतेचे वर्णन भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा वारसा आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी धर्मग्रंथ म्हणून केले. तसेच भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचं म्हटलं आहे.
आरिफ मोहम्मद खान यांनी काय म्हटलं?
हरियाणातील कुरुक्षेत्र विद्यापीठात गीता परिषदेला संबोधित करताना राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी जागतिक पर्यावरण संरक्षणात भगवद्गीतेचं महत्त्व सांगितलं. तसेच भगवद्गीतेचा संदेश जगभर पोहोचवण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. तसेच गीतेत उपनिषद आणि वैदिक ग्रंथांची मूलभूत तत्त्वे असून जी भारताची एकता आणि अखंडता दर्शवतात. भगवद्गीतेमधून मानवतेचा फायदा होईल, केवळ भगवद्गीताच मानवतेचे कल्याण करेल, असं आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटलं. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
तसेच आरिफ मोहम्मद खान यांनी पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी गीतेच्या भूमिकेवर भर दिला आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश जगभर पसरवला गेला पाहिजे असंही म्हटलं. तसेच हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी या गीता परिषदेला संबोधित करताना गीतेचा पर्यावरण रक्षणाचा संदेश आणि मानवी जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठीचं महत्त्व अधोरेखित केलं. ‘भगवद्गीता हा सर्व मानवतेच्या कल्याणासाठी पवित्र ग्रंथ असल्याचं राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी म्हटलं.
तसेच उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंह यांनी या संबोधित करताना म्हटलं की, भगवद्गीता लोकांना संकटाच्या वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करते. तसेच भगवद्गीतेची शिकवण आणि हरियाणाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार करण्यासाठी कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या प्रयत्नांचीही गुरमीत सिंह यांनी प्रशंसा केली.