केरळमधील तिरुवअनंतपुरम महापालिका, वडक्केनचेरी ग्राम पंचायत येथे निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी ईश्वरसाक्षीने किंवा गांभीर्यपूर्वक घेतलेल्या शपथेशिवाय अन्य कोणत्याही प्रकारे घेतलेली शपथ केरळ उच्च न्यायालयाने अवैध ठरवली आहे. यामुळे तिरुवअनंतपुरम महापालिकेतील अनेक भाजप नगरसेवकांनी घेतलेली शपथ अवैध ठरली आहे.

केरळ उच्च न्यायालयाचे न्या. पी. व्ही. कुन्हीकृष्णन यांनी बुधवारी दिलेल्या निकालात स्पष्ट केले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या लोकप्रितनिधींनी केवळ कायद्याने विहित केलेल्या पद्धतीनेच शपथ घेतली पाहिजे. नागरिक म्हणून ते कोणत्याही देवतेची पूजा करण्यास किंवा धर्माचे पालन करण्यास मुक्त असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

तिरुवअनंतपुरम महापालिकेत २० नगरसेवकांनी भारतमाता, गुरुदेव आणि विविध नेत्यांचे स्मरण करून शपथ घेतली होती. त्याविरोधात एक याचिका दाखल होती. तसेच, पलक्कड जिल्ह्यतील वडक्केनचेरी ग्राम पंचायतीच्या एका सदस्याने ‘ईश्वराच्या आशीर्वादाने, ओम्मन चंडी यांच्या नावाने’ शपथ घेतली होती.

न्यायाधीशांचे म्हणणे

न्यायाधीशांंनी नमूद केले की, केरळ महानगरपालिका कायदा आणि केरळ पंचायत कायद्यानुसार लोकनियुक्त प्रतिनिधी केवळ ईश्वरसाक्षीने किंवा गांभीर्यपूर्वक कथन करून शपथ घेऊ शकतात. विशिष्ट देवता, भारतमाता, व्यक्तींच्या नावाने कोणालाही शपथ घेता येणार नाही.