“घटनात्मक लोकशाहीत आणि विशेषतः शैक्षणिक संस्थांमध्ये धरणे, उपोषण किंवा सत्याग्रहासारख्या राजकीय आंदोलनांना स्थान नाही,” असे स्पष्ट करत केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. एर्नाकुलम येथील ‘श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठा’तील निलंबित विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी देणारा आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्द केला आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

ऑगस्ट महिन्यात विद्यापीठाच्या कुलगुरू सीझा थॉमस यांचा कथितरित्या अपमान करणारे पथनाट्य सादर केल्याबद्दल आणि आंदोलन केल्याबद्दल ‘माकप’ची विद्यार्थी संघटना असलेल्या एसएफआयच्या १६ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून निलंबित करण्यात आले होते. हे विद्यार्थी मूलभूत सुविधा आणि शैक्षणिक मागण्यांसाठी आंदोलन करत होते.

निलंबनामुळे आणि अनिवार्य उपस्थितीची अट पूर्ण न केल्यामुळे या विद्यार्थ्यांना सत्र परीक्षेला बसता येत नव्हते. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

यापूर्वी, एकल पीठाने याचिकाकर्त्या १६ निलंबित विद्यार्थ्यांना फी भरून परीक्षेला बसण्याची सशर्त परवानगी दिली होती. अंतिम निकालाच्या अधीन राहून ही परवानगी देण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. मात्र, या निर्णयाविरोधात विद्यापीठाने ३० ऑक्टोबर रोजी खंडपीठाकडे दाद मागितली.

खंडपीठाचे कठोर ताशेरे

न्यायमूर्ती अनिल के. नरेंद्रन आणि न्यायमूर्ती एस. मुरली कृष्णन यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी करताना एकल पीठाचा आदेश रद्द केला. “विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र असल्याचे दर्शवणारा कोणताही ठोस पुरावा नसताना एकल पीठाने दिलेला दिलासा चुकीचा होता,” असे न्यायालयाने नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्देशांचा हवाला देत खंडपीठाने स्पष्ट केले की, नियम किंवा वैधानिक तरतुदींचे उल्लंघन होईल असा कोणताही दिलासा न्यायालये देऊ शकत नाहीत. उपस्थितीचे नियम पूर्ण न करता विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिल्यास कायद्याचे उल्लंघन होईल आणि विद्यापीठाच्या शिस्तभंगाच्या कारवाईला धक्का पोहोचेल, असे न्यायालयाने म्हटले.

‘शैक्षणिक संस्था राजकारणासाठी नव्हे, तर शिक्षणासाठी’

उच्च न्यायालयाच्या जुन्या निकालांचा संदर्भ देत खंडपीठाने अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली: “घटनात्मक लोकशाहीत धरणे, उपोषण किंवा सत्याग्रह यांसारख्या पद्धतींना स्थान नाही, आणि शैक्षणिक संस्थांमध्ये तर ते अजिबात चालणार नाही. अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते.”

न्यायालयाने पुढे बजावले की, शैक्षणिक संस्था या केवळ ज्ञानदानासाठी आहेत, राजकारणासाठी नाहीत. राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी शैक्षणिक संस्थांना किंवा इतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अधिकाराला ओलिस ठेवता कामा नये.

उपस्थितीच्या नियमांचे पालन आवश्यक

विद्यापीठाच्या नियमानुसार किमान उपस्थिती, अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण होणे किंवा उपस्थितीतील तुटीसाठी केलेला अर्ज याविषयी याचिकेत कोणतीही माहिती अथवा पुरावा देण्यात आला नव्हता, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. शैक्षणिक शिस्त राखलीच पाहिजे, विद्यापीठीय वातावरणात राजकीय हालचाली अयोग्य आहेत आणि निलंबनानंतर नियमांनुसार परीक्षेला बसण्यास अपात्र ठरण्याच्या परिणामांचे पालन केलेच पाहिजे, यावर न्यायालयाने ठाम भर दिला.