केरळमध्ये डेंग्यू आणि स्वाईन फ्लू या दोन्ही तापांचा कहर माजला आहे. तसेच विविध प्रकारच्या साथीच्या तापानेही लोकांना ग्रासले आहे. यामुळे जानेवारी महिन्यापासून आत्तापर्यंत १०३ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यापैकी ५३ लोक हे स्वाईन फ्लूने दगावले आहेत, तर १३ लोकांचा मृत्यू डेंग्यूने झाला आहे. इतर लोक विविध प्रकारच्या साथीच्या तापांनी मरण पावले आहेत. केरळ सरकारने सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. तापामुळे झालेल्या या मृत्यूंमधे मोठ्या प्रमाणावर लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. लेप्टोस्पायरीसस, डेंग्यू आणि स्वाईन फ्लूमुळे हे मृत्यू झाले असल्याची माहिती , केरळच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

केरळच्या अनेक भागांमध्ये कचरा आणि सांडपाणी यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानेच डेंग्यू, लेप्टो या तापाचा प्रभाव वाढला आहे. तर स्वाईन फ्लूसाठी कारणीभूत असलेले एच १ एन १ हे विषाणू कडक उन्हातही तग धरू लागले आहेत. जानेवारी ते जून या कालावाधीत उन्हाचा प्रभाव मार्च ते मे या महिन्यात जास्त होता. त्या वातावरणातही हे विषाणू टीकले आहेत. त्याचमुळे स्वाईन फ्लूचा कहर वाढला आहे, असेही केरळच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.

केरळमध्ये समोर आलेल्या या आकडेवारीनंतर राज्यात स्वच्छता मोहिम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केरळ सरकारतर्फे करण्यात आले आहे. या मोहिमेत सामाजिक संस्था आणि स्थानिक नेतेही सहभागी झाले आहेत.

ज्या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे तिथे साथीच्या तापांचे प्रमाण कमी झाले आहे अशी माहिती आरोग्य विभागाचे विजयन यांनी दिली आहे. सगळ्या सरकारी रूग्णालयात उपचारांसाठी लागणारी औषधे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत असेही त्यांनी सांगितले आहे.

याप्रकरणी विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांनी मात्र सरकारवर आरोप केले आहेत, जानेवारीपासून आत्तापर्यंत १०३ नाही तर ११७ लोकांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच स्वाईन फ्लू, डेंग्यू आणि लेप्टो या तापाचे २० हजारांपेक्षा जास्त रूग्ण राज्यातल्या विविध सरकारी रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत असेही म्हटले आहे. साथीच्या तापांचा कहर वाढण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग आणि आरोग्य मंत्री के.के. शायलजा जबाबदार असल्याचा आरोपही चेन्नीथला यांनी केला आहे. तर आम्ही जनतेची काळजी घेत आहोत, मात्र विरोधक तापाचेही राजकारण करत आहेत असे उत्तर शायलजा यांनी दिले आहे.