Kerala Islamic friendly gym controversy: केरळमधील ‘इस्लामिक- फ्रेन्डली जिम’मुळे समाज माध्यमांवर चर्चांना तोंड फुटले आहे. पालक्काड जिल्ह्यातील एका फिटनेस सेंटरने त्यांची ‘इस्लामिक- फ्रेन्डली जिम’ असल्याचे जाहीर केल्याने वाद निर्माण झाला आहे. नेटकऱ्यांनी या घोषणेनंतर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. या जिमचा प्रमो व्हिडीओ समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. जिममध्ये संगीत वाजवले जाणार नाही तसेच वेळेचा देखील उल्लेख करण्यात आला.

व्हिडीओनंतर वाद

नवाज मुथू असे या जिम मालकाचे नाव आहे. या जिमचा एक प्रमो व्हिडीओ अलिकडे समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओत नवाज यांनी जिममध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजवले जाणार नाही, व्यायम करण्यासाठी वेगळी वेळ आणि महिला आणि पुरुषांसाठी वेगळ्या जागाचे उल्लेख केला आहे. याशिवाय ट्रेनर्स देखील वेगळे पुरवले जातील, असे स्पष्ट केले आहे. या व्हिडीओनंतर समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली. अनेकांनी या संकल्पनेवर जोरदार टीका केली.

टीकेनंतर जिम मालकाचे स्पष्टीकरण

“आम्ही इस्लाम फ्रेन्डली जिम सुरु करत आहोत. ही केरळमधील पहिली वेगळी संकल्पना असेल असा आमचा विश्वास आहे. इच्छुकांनी आम्हाला संपर्क करावा आणि सेंटरला भेट द्यावी”, असे आवाहन जिम मालक नवाज या व्हिडीओत करत आहेत. ही जिम काय नव्याने सुरु होत नाही. १५ वर्षापासून कार्यरत असणाऱ्या य जिमचे सध्या नूतनीकरण होत असल्याचेही नवाज म्हणाले. नेटकऱ्यांनी जोरदार विरोध आणि उघड नाराजी दर्शविल्यानंतर मालक नवाज यांनी मूळ व्हिडीओ हटवून त्याठिकाणी दुसरा व्हिडीओ प्रसिद्ध केला. यात त्यांनी सर्व धर्मांच्या लोकांसाठी जिम खुली असल्याचे स्पष्टीकरण दिले.

मालकाने स्पष्ट केली संकल्पना

“अनेकांनी ही जिम मुस्लिम असून, केवळ मुस्लिमांसाठी असल्याचे म्हटले. पण, मी ही जिम केवळ मुस्लिमांसाठी असल्याचे केव्हाच म्हटले नाही”, असे नवाज यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण देताना सांगितले. “इस्लामिक फ्रेन्डली जिम म्हणजे, महिला आणि पुरुषांसाठी व्यायम करण्यासाठी वेगळी जागा आणि वेळ. तसेच, कमी अवाजात वाजणारे संगीत”, अशी संकल्पना असल्याचे नवाज म्हणाले. मुस्लिम समुदायातील अनेकजण योग्य व्यवस्था नसल्याने जिममध्ये येण्यास टाळाटाळ करतात, असे नवाज पुढे म्हणाले.

मी स्वत: मुस्लिम असल्याने…- नवाज

“मुस्लिम समुदायातील अनेकजण अजून त्यांचा प्रथा पाळत असतात. ते संगीत ऐकत नाहीत. त्यांच्यासाठी कोणतीही वेगळी जिम नाही. आणि जिममध्ये गेल्यानंतर संगीत बंद करणे शक्य नसते. महिलांना या जिममध्ये कम्फर्टेबल नसतात, त्यामुळे अनेकजण जिम करण्यास टाळाटाळ करतात. मी स्वत: मुस्लिम असल्याने मला या गोष्टी माहिती आहेत. माझे नातेवाईक देखील जिममध्ये जात नाहीत. अशा लोकांसाठी ही जिम फायदेशीर ठरेल”, असे स्पष्टीकरण नवाज यांनी दिले.