मागच्या काही दिवसांपासून केरळमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे तिथे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. दररोज मृतांचा आकडा वाढत चालला आहे. अनेकांना आपले राहते घर सोडावे लागले आहे. या कठिण प्रसंगात माणूसकीची वेगवेगळी उदहारणे समोर येत आहेत. केरळी जनतेच्या मदतीसाठी देशभरातून देणगीच्या रुपाने मदतीचा ओघ सुरु आहे तसेच पूरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी अनेकांनी आपल्या घराचे दरवाजे उघडले आहेत.

माणुसकीचे दर्शन घडवणारे असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. केरळमधल्या एका पत्रकाराने मुलीचा साखपुडयाचा सोहळा रद्द करुन ते पैसे मुख्यमंत्री मदत निधीमध्ये जमा केले आहेत. राज्यातील ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन देशाभिमानीचे कार्यकारी संपादक मनोज यांनी नवऱ्या मुलाच्या कुटुंबाबरोबर चर्चा केली. दोन्ही कुटुंबांनी परिस्थितीचे गांर्भीय लक्षात घेऊन साखरपुडा रद्द केला व तेच पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले. देशाभिमानी हे सीपीआय(एम)चे मुखपत्र आहे. रविवारी कन्नूर येथे हा साखरपुडा होणार होता.

केरळमध्ये आठ ऑगस्टपासून धुवाधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत १६४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विविध भागात अडकलेल्या नागरिकांची सुखरुप सुटका करण्यासाठी आमचे सर्व प्रयत्न सुरु आहेत. संपूर्ण राज्यात १,५६८ मदत छावण्या उभारण्यात आल्या असून तिथे दोन लाख २३ हजार लोकांनी आश्रय घेतला आहे अशी माहिती मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी दिली.

पुढील सात दिवस केरळमध्ये मोफत दुरध्वनी सेवा
पुढील सात दिवस केरळमध्ये दुरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी या फोन कॉल आणि मोबाईल डाटा वापर विनामुल्य करण्याचं ठरवण्यात आल्याची माहिती वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली आहे. रिलायन्स जिओ आणि बीएसएनएलकडूनही मोफत टेलिफोन सेवा पुरवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय वोडाफोन, भारती एअरटेल, आयडिया सेल्युलर यांच्यातर्फेही पुढचे सात दिवस दुरध्वनी सेवांमध्ये काही महत्त्वाच्या सवलती देण्यात आल्या आहेत.