Kerala Local Body Election Result: दक्षिणेतील केरळ राज्यात विस्तार करण्यासाठी गेल्या काही काळापासून भाजपाकडून प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नांना यश येताना दिसून येत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने केरळच्या राजधानीत मोठा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे नेते शशी थरूर ज्या मतदारसंघातून निवडून येतात त्या तिरुअनंतपुरम महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाचा उदय झाला आहे. यामुळे डाव्या लोकशाही आघाडीची ४५ वर्षांची निरंकुश सत्ता संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
तिरुअनंतपुरम महानगरपालिकेतील १०१ पैकी ५० वॉर्डमध्ये एनडीएने विजय मिळवला, तर सत्ताधारी एलडीएफला केवळ २९ जागा जिंकता आल्या. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) १९ जागा जिंकण्यात यश आले. दोन ठिकाणी अपक्षांचा विजय झाला. तसेच एका वॉर्डमध्ये गेल्या आठवड्यात उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे त्या वॉर्डमधील निवडणूक रद्द करण्यात आली होती.
या निकालांमधून शहराचा राजकीय समतोल बदलला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आता एनडीए मजबूत स्थितीत दिसत आहे. तिरुअनंतपुरम जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांचे हे शहर असल्यामुळे हा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. राज्याच्या राजधानीत भाजपाचा विजय झाल्यामुळे ही बाबही अधोरेखित होत आहे.
पंतप्रधान मोदींनी मतदारांचे मानले आभार
“केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा आणि एनडीएच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या मतदारांचे मी आभार मानतो. केरळची जनता यूडीएफ आणि एलडीएफला कंटाळली होती. त्यांना एनडीए हा एकमेव पर्याय दिसत होता, जो त्यांना सुशासन देऊ शकतो”, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी विजयचा आनंद व्यक्त केला.
शनिवारी (१३ डिसेंबर) केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू असताना त्रिपुनिथुरा नगरपालिकेची सत्ता काबीज करत भाजपाने सत्ताधारी एलडीएफला सत्तेतून खाली खेचले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल भाजपासाठी मोठे यश असल्याचे मानले जाते.
शशी थरूर काय म्हणाले?
केरळच्या या निकालांवर शशी थरूर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच काँग्रेसप्रणीत आघाडी यूडीएफने केलेल्या एकूण कामगिरीबद्दल त्यांनी अभिनंदन व्यक्त केले. राज्यात विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी या निवडणुकीमधून महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. तसेच तिरुअनंतपुरम जिल्ह्यात भाजपाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाची कबुली दिली.
शशी थरूर म्हणाले, या निकालांमधून मतदारांची बदललेली इच्छा प्रतिबिंबत होत आहे. एलडीएफच्या राजवटीतून केरळला मुक्ती मिळावी, यासाठी मी प्रचार केला होता. मात्र मतदारांनी दुसऱ्या पक्षाची निवड केली. मात्र हेच लोकशाहीचे सौंदर्य आहे. जनतेच्या मताचा आदर केला पाहिजे. आमचा पक्ष राज्याच्या भल्यासाठी काम करत राहिल.
