Kerala mother kills Daughter : तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील मलयिनकीझू येथे एका दीड वर्षाच्या चिमुरडीची तिच्या आईनेच गळा चिरून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इव्हाना असं मृत बालिकेचं नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान विलावूरकल गावातील एका घरात घडल्याचं सांगण्यात येत आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
बेडरुममध्ये नेलं अन्…
एफआयआरनुसार, आरोपी महिलेने स्वतःला आणि मुलीला बेडरूममध्ये कोंडून घेतलं आणि त्यानंतर चाकूने मुलीवर वार केले. परिणामी तिच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली. आई आणि मुलगी बराच वेळ बाहेर न आल्याचं लक्षात आल्यावर एका नातेवाईकाने बंद दरवाजा ठोठावला, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. ख्रिस्ती नावाच्या आईने बाहेर येऊन आपणच मुलीला मारल्याचे त्या नातेवाईकाला सांगितले.
दरम्यान, जखमी चिमुकलीला विलावूरकल प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं आणि नंतर ‘१०८’ रुग्णवाहिकेने तिरुवनंतपुरम येथील सॅट (SAT) रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी संध्याकाळी सुमारे सहा वाजता तपासणी करून तिला मृत घोषित केलं.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस चिमुकलीच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती आणि या कृत्यामागच्या कारणाचा शोध घेत आहेत.
