Kerala New Chief Minister Announcement: केरळच्या मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेसमध्ये गेल्या नऊ दिवसांपासून मॅरेथॉन चर्चा झाली. निकालानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत सुरु झालेला सस्पेन्स अखेर समाप्त झाला आहे. प्रदीर्घ विचारविनिमयानंतर अखेर काँग्रेस आज (गुरुवारी) मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा करणार आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीने दणदणीत विजय मिळवला. पण, सत्ता स्थापनेला विलंब होत असल्याने पक्षात आणि नागरिकांमध्ये देखील नाराजीचे वातावरण निर्माण झाले.

खरगे – राहुल गांधी यांच्यात ४० मिनिटे बैठक

केरळमधील सत्ता स्थापनेचा तिढा काही सुटण्याचे नाव घेत नव्हता. दिल्लीत केरळच्या नेत्यांना बोलावून हायकमांडने अनेक बैठका घेतल्या. दरम्यान, बुधवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राहुल गांधी यांच्याबरोबर खरगे यांची बैठक पार पडली. जवळपास ४० मिनिटे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आले आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “बैठक पार पडली असून, गुरुवारी अंतिम निर्णय जाहीर केला जाईल”, असे जयराम रमेश म्हणाले.

उद्या होणार घोषणा – जयराम रमेश

“काँग्रेसच्या हायकमांडने सर्व चर्चा पूर्ण केल्या आहेत. केरळचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय उद्या जाहीर केला जाईल,” असे जयराम रमेश म्हणाले. ही घोषणा दिल्लीत होणार की केरळमध्ये, असे विचारले असता त्यांनी, “उद्या केरळच्या मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, केरळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सनी जोसेफ यांनी बुधवारी पक्षांतर्गत चर्चा पूर्ण झाली असून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल असे संकेत दिले होते.

सत्ता स्थापनेचा तिढा

केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीला दोन-तृतीयांश बहुमत मिळाले होते. ४ मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर येथे काँग्रेसचा कोण मुख्यमंत्री होणार याबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीसाठी इथं के.सी. वेणुगोपाल, व्ही.डी. सतीशन आणि रमेश चेन्नीथला अशी तीन नावं समोर आली. या तिघांना समर्थन असणारे तीन गट देखील उदयास आला, त्यामुळे काँग्रेससमोर पेच निर्माण झाला होता. अखेर काँग्रेसने हा तिढा सोडवला असून, गुरुवारी मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. ते नाव या तीन पैकी एकाचे असणार की काँग्रेस वेगळा पर्याय निवडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागरिकांमध्ये रोष

दरम्यान, सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसल्याने राज्यातील नागरिकांनी आता संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. एवढेच नव्हे तर राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघात देखील धुसफूस सुरु झाली, गांधींना इशारा देणारे पोस्टर शहरात झळकू लागले. “मिस्टर राहुल आणि प्रियांका, वायनाड विसरा. तुम्ही पुन्हा येथून विजयी होणार नाही”, असा संदेश देणारे पोस्टर वायनाडमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाबाहेर झळकले. याशिवाय आणखी काही पोस्टर समोर आली असून, यात गांधींना इशाराच देण्यात आल्याचे पाहायला मिळाले.