Kerala New CM V. D. Satheesan confirmed by Congress: गेल्या १० दिवसांपासून केरळमध्ये ज्या प्रश्नाची जोरदार चर्चा होती, त्याचं उत्तर अखेर काँग्रेसप्रणीत यूडीएफ अर्थात युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने शोधलं आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि लोकसभा खासदार के. सी. वेणूगोपाल व रमेश चेन्नीथला यांच्याशी सतीशन यांची थेट स्पर्धा होती. केरळ काँग्रेसबरोबरच दिल्ली काँग्रेसमधील नेतेमंडळींमध्येदेखील या तिघांबाबत एकमत होऊ शकत नव्हतं. अखेर चर्चेच्या अनेक फेऱ्या आणि राज्यातील दिग्गज नेत्यांसोबत झालेल्या बैठकांनंतर काँग्रेस नेतृत्वानं व्ही. डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून सतीशन यांचा शपथविधी होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
४ मे रोजी तमिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी या चार राज्यांसह केरळचेदेखील निकाल जाहीर झाले. केरळमधील डाव्याच्या आघाडीचा पराभव करत काँग्रेसप्रणीत यूडीएफनं बहुमत मिळवलं. मात्र, राज्याचं नेतृत्व नेमकं कोण करणार? याबाबत केरळमध्ये तिढा निर्माण झाला. काँग्रेसमदून काही दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत आली. त्यापैकी व्ही. डी. सतीशन यांच्यासोबतच रमेश चेन्नीथला व केंद्रात गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असणारे काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांचं नाव स्पर्धेत होतं.
वेणुगोपाल व सतीशन या तिघांनाही पाठिंबा देणारे गट काँग्रेसमध्ये अस्तित्वात होते. त्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वासमोर नेमकी कुणाची निवड करावी? असा पेच निर्माण झाला होता. त्यासाठी गेल्या १० दिवसांत चर्चेच्या अनेक फेऱ्या काँग्रेसमध्ये पार पडल्या. केरळमधील नेत्यांना दिल्लीत पाचारण करून त्यांच्याशी बैठका झाल्या. खुद्द लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीदेखील तिन्ही बाजूच्या नेत्यांच्या बैठका घेतल्यानंतर अखेर गुरुवारी १४ मे रोजी म्हणजेच निकालांनंतर १० दिवसांनी काँग्रेसकडून सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
बुधवारचा दिवस बैठकांचा!
निकाल जाहीर होऊन १० दिवस उलटल्यानंतरदेखील मुख्यमंत्रीपदाचं नाव ठरत नसल्यामुळे काँग्रेसवर इतर पक्षांकडून, विशेषत: भारतीय जनता पक्षाकडून टीका केली जात होती. त्यामुळे पक्षावरील राजकीय दबाव वाढत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. शिवाय केरळमध्येदेखील याबाबतची कुजबूज सुरू झाली होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा करणं काँग्रेससाठी क्रमप्राप्त ठरलं होतं. या पार्श्वभूमीवर बुधवारी दिल्लीत राहुल गांधी यांची पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी जवळपास ४० मिनिटं बैठक झाली. या बैठकीत अखेर सर्व पर्यायांचा विचार करता एका नावाची निश्चिती झाली. हे नाव गुरुवारी जाहीर केलं जाईल, असं जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आज सतीशन यांचं नाव पक्षाकडून जाहीर करण्यात आलं.
केरळ विधानसभा २०२६ निवडणूक निकाल
केरळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी जाहीर करण्यात आले. त्यानुसार काँग्रेसला १४० पैकी ६३ जागांवर विजय मिळाला आहे. त्यापाठोपाठ माकपसा २६, आययूएमएल पक्षाला २२ जागांवर विजय मिळाला. भाकप पक्षाला ८, केईसीला ७, आरएसपीला ३ तर इतर व अपक्ष मिळून ११ आमदार या निवडणुकीत निवडून आले.
