केरळमधील कोल्लम पोलीस स्थानकातील आयुक्त मेरिन जोसेफ यांनी एक सौदी अरेबियामधील रियाधमध्ये जाऊन भारतातून पळून गेलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. जोसेफ त्यांची टीम आणि इंटरपोलचे काही अधिकारी १४ जुलै रोजी रियाधला गेले होते. लहान मुलांवर बलात्कार केल्याप्रकरणी फरार असलेल्या सुनील कुमार भाद्रान या इसमाला अटक करण्याची जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आखण्यात आली होती.

कोल्लम येथील स्थानिक असणारा सुनील हा सौदी अरेबियामध्ये लाद्या बसवण्याचे काम करतो. २०१७ साली सुनीलने त्याच्या मित्राच्या भाचीवर तीन महिने लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणात या मुलीच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु झाला. मात्र पोलिसांनी सुनीलला चौकशीसाठी नोटीस पाठवण्याआधीच तो सौदी अरेबियामध्ये पळून गेला.

दरम्यान या पिडीत मुलीला कोल्लम तालुक्यातील कारीकोडमधील सरकारी महिला मंदिर येथील सुधारणागृहात ठेवण्यात आले. मात्र या मुलीने २०१७ मध्ये जून महिन्यात आत्महत्या केली. त्याआधी या प्रकरणानंतर सुनीलशी ओळख करुन देणाऱ्या या मुलीच्या मामानेही तणावामुळे आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवले.

२०१९ साली जोसेफ यांची कोल्लममधील आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सर्व प्रलंबित प्रकरणे हाती घेतली. त्यातही महिला आणि मुलींशी संबंधित प्रकरणांना जोसेफ यांनी विशेष प्राधान्य दिले. त्याचवेळी त्यांना सुनील प्रकरणाची माहिती मिळाली. या प्रकरणाबद्दल जोसेफ यांनी ‘द लॉजिकल इंडियन’ला माहिती दिली. ‘या प्रकरणातील आरोपी मागील दोन वर्षांपासून फरार होता त्यामुळे या प्रकरणाचा तपासही रखडला होता. या प्रकरणानंतर दोन आत्महत्या झाल्याने या मुलीला न्याय मिळून द्यावा अशी स्थानिकांची भावना होती,’ असं जोसेफ म्हणतात. याप्रकरणामध्ये २०१७ सालीच सुनील विरोधात इंटरपोलने नोटीस जारी केली होती तरीही या प्रकरणाचा काहीच निकाल लागत नव्हता. सतत या प्रकरणाचा पाठपुरावा करणे तसेच इतर देशांमधील अधिकाऱ्यांशी संपर्कात राहणे या सर्वांच्या दरम्यान दोन वर्षांचा कालावधी गेल्याने यामुळे हे प्रकरण गुंतागुंतीचे झाले होते. ‘सुनीलला भारतामध्ये परत आणण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. त्याच वेळी आम्हाला दिल्ली सीबीआयची नोटीस आली ज्यामध्ये सुनील रियाधला असल्याची माहिती देण्यात आली होती,’ असं जोसेफ यांनी सांगितले.

‘परदेशात जाऊन एखाद्या आरोपीला अटक करणे सोप्पी गोष्ट नसते. मात्र आम्ही हे काम अगदी चोखपणे पार पाडले. सौदीमधील इंटरपोल, भारतीय दूतावास, आंतरराष्ट्रीय तपास समिती, गुन्हेअन्वेषण खाते या सर्वांना अनेक कागदपत्रे द्यावी लागली. सुनील कोणत्याही परिस्थितीमध्ये हातातून निसटता कामा नये म्हणून पोलिसांनी सुनीलला जामीन मिळणार नाही याचीही काळजी घेतली होती,’ असं जोसेफ म्हणाल्या. अखेर पोलिसांनी सुनीलला अटक केली आणि त्याला भारतात परत आणले. सौदी अरेबियामधून भारताकडे हस्तांतरित करण्यात आलेला सुनील हा पहिलाच भारतीय आरोपी ठरला आहे.

‘या प्रकरणात जलद सुनावणी करण्यात यावी अशी विनंती आम्ही न्यायलयामध्ये करणार आहोत. हे प्रकरण सर्व गुन्हेगारांमध्ये कायदा कोणालाही सोडत नसतो असा संदेश देणारे ठरेल,’ असा विश्वास जोसेफ यांनी व्यक्त केला.