पीटीआय, चेन्नई, तिरुवअनंतपुरम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केरळ आणि तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. केरळ दौऱ्यात त्यांनी काँग्रेसला ‘मुस्लीम लीग माओवादी काँग्रेस’ (एमएमसी) असे म्हणत हिणवले, तर तमिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रमुकवर भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीला आश्रय दिल्याचा आरोप केला. या दोन्ही राज्यांमध्ये येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांचे शुक्रवारी सकाळी तिरुवअनंतपुरम येथे आगमन झाले. तिरुवअनंतपुरम येथे त्यांनी पुतरीकंदम मैदानात आयोजित कार्यक्रमात विविध प्रकल्पांची पायाभरणी केली. त्यांनी रोडशोमध्ये सहभाग घेतला आणि त्यानंतर विशाल सभेमध्ये भाषण करताना सत्ताधारी डावे पक्ष आणि काँग्रेसवर विविध मुद्द्यांवरून टीका केली.
केरळमध्ये शबरीमला मंदिरातील सोन्याच्या चोरीचा मुद्दा उपस्थित करत मोदी म्हणाले की, मंदिरातील सोने चोरणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. आम्ही सत्तेत आल्यावर या चोरीची चौकशी करू असे आश्वासन त्यांनी दिले. सत्ताधारी डाव्या पक्षांनी शबरीमलाची परंपरा कलंकित करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही, अशी टीका मोदींनी केली. केरळला पुढील २५ वर्षांमध्ये विकसित राज्य करण्यासाठी भाजपला प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यातील काँग्रेस आणि मुस्लीम लीगच्या आघाडीला लक्ष्य करत त्यांनी काँग्रेसचा उल्लेख ‘मुस्लीम लीग माओवादी काँग्रेस’ असा केला. ते म्हणाले, “काँग्रेसच्या बाबतीत अधिक सावध राहण्याची गरज आहे, कारण ते केरळच्या भूमीचा वापर त्यांच्या रणनीती आखण्यासाठी करत आहेत. ते राज्यामध्ये धार्मिक तणावाला खतपाणी घालत आहेत.”
केरळचा दौरा झाल्यानंतर पंतप्रधान मोदी तमिळनाडूला रवाना झाले. तमिळनाडूच्या मदुरंतकम येथे आयोजित विशाल सभेला भाजपसह रालोआच्या अण्णाद्रमुक, अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम (एएमएमके), पीएमके या घटक पक्षांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी अण्णाद्रमुकचे अध्यक्ष आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते ई. के. पलानीस्वामी, एममएमकेचे प्रमुख टी. टी. व्ही. दिनाकरन, पीएमकेचे अध्यक्ष डॉ. अंबुमणी रामदास, टीएमसी-एमचे नेते जी. के. वासन यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. सभेला चारही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
यावेळी द्रमुक म्हणजे ‘भ्रष्टाचार, माफिया, गुन्हेगारां’चे (सीएमसी) सरकार असे म्हणत मोदी यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. “राज्यातील जनतेने द्रमुकला सत्तेतून बाहेर काढण्याचा निश्चय केला आहे. या पक्षाची उलटगणती सुरू झाली आहे,” असे ते म्हणाले. राज्याला द्रमुकच्या गैरकारभारापासून मुक्ती हवी आहे आणि राज्यातील जनता भाजप-रालोआच्या सुशासनाकडे आशेने पाहत आहे, असा दावाही पंतप्रधानांनी केला. तिरुपरंकुंद्रम येथील मुरुगन मंदिरात दिवे लावण्याच्या वादावरून त्यांनी द्रमुकवर टीका केली. द्रमुकच्या राजवटीत घराणेशाही, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार आणि संस्कृतीचा अपमान होत असल्याचा आरोप मोदी यांनी केला.
केरळमध्ये विविध प्रकल्पांची पायाभरणी
पंतप्रधान मोदी यांनी तिरुवअनंतपुरमच्या पुतरीकंदम मैदान येथे आयोजित कार्यक्रमात राज्यासाठी विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. तसेच राज्यातील काही रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे, याची जनतेला जाणीव होत आहे, असे ते यावेळी म्हणाले. त्रिसूर-गुरुवायूर प्रवासी रेल्वेमुळे केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगण आणि आंध्र प्रदेशात रेल्वेची जोडणी वाढणार आहे. तिरुवअनंतपुरम येथे ‘सीएसआयआर-एनआयआएसटी इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी अँड आंत्रप्रुनरशिप’ केंद्राचा शिल्यानास मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच काही नवीन योजनाही सुरू करण्यात आल्या.
काँग्रेसकडे विकासाचा कार्यक्रम नाही. त्यांनी माओवाद्यांपेक्षा जास्त साम्यवादी आणि मुस्लीम लीगपेक्षा जास्त जातीयवादी भूमिका घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसला देशभरात ‘एमएमसी’ असे म्हटले जाते.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
