Kerala techie survived in wild forest for 4 days : गिर्यारोहण करणं सोपं नसतं. त्यात बरेच आव्हान असतात. तुम्ही एखाद्या ग्रुपबरोबर गिर्यारोहणासाठी गेलात तर हे आव्हान जरा कमी होतं. पण या ग्रुपमधून तुम्ही एकट्या बाहेर पडलात आणि घनदाट जंगलात एकट्याच हरवलात तर? कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यातील ताडियांदामोल टेकड्यांच्या घनदाट जंगलात अशीच गिर्हारोहक अडकली. तब्बल चार दिवस ती त्या घनदाट जंगलात एकटीच राहिली. तिच्याकडे फक्त ५०० एमएल पाणी होतं अन् मोबाईलही स्वीच ऑफ झाला होता. या परिस्थितीत ती हिंस्र जंगली प्राण्यांच्या वावरात एकटी कशी राहिली, त्याची थक्क करणारी ही सत्य कहाणी पाहुयात.

केरळमधील ३६ वर्षीय टेक प्रोफेशनल जी.एस. शरण्या २ एप्रिल रोजी एका गटाबरोबर ट्रेकिंगला गेली होती. या दरम्यान, ती रस्ता भरकटली. घनदाट जंगलात चार दिवस घालवल्यानंतरच तिचा शोध लागला. या काळात शरण्याने आपल्या होमस्टेवर परतण्यासाठी किंवा शोधकर्त्यांना सापडण्यासाठी मोठा संघर्ष केला, पण तिने आपले हास्य आणि धैर्य कधीही सोडले नाही. अनेक यंत्रणांनी राबवलेल्या अहोरात्र शोधमोहिमेमुळे अखेर तिचा शोध लागला. वन अधिकारी, नक्षलविरोधी पथकाचे (ANS) सदस्य आणि स्थानिक आदिवासी समुदायांसह नऊ पथकांनी ही मोहीम राबवली होती. ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर लगेचच ही मोहीम सुरू करण्यात आली होती. हिंदुस्थान टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ती चार दिवस जंगलात कशी जिवंत राहिली?

जेव्हा हा गट टेकडीवरून खाली उतरत होता, तेव्हा शरण्या मागे राहिली. तिने इतर सदस्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिला कळलं की ती बराच वेळ एकटीच आहे. तिच्याकडे फक्त ५०० मिली पाणी उरले होते आणि फोनची बॅटरी संपत आली होती. पुढे तिने काय केले? ती चालत राहिली आणि आपल्या एका मित्राशी तसेच ती ज्या होमस्टेमध्ये थांबली होती तिथे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोन बंद होण्यापूर्वी तिने मित्राला आणि होमस्टेला माहिती देण्यात यश मिळवले.

ती सांगते, “मी लोकांना शोधण्यासाठी डावीकडे वळले, पण जंगल खूप दाट असल्याने रस्ता हरवले. संध्याकाळी ६:४५ पर्यंत मी खाली उतरत राहिले, मला वाटले की कोणीतरी भेटेल, पण तसे झाले नाही. म्हणून मी टेकडीवरच थांबले. मी माझा मित्र यदूला फोन करून इतरांना कळवण्यास सांगितले. मी हेल्पलाईन क्रमांकावर मेसेज करण्याचा प्रयत्न करत असतानाच माझा फोन बंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे पाय दुखत होते, त्यामुळे मी चालू शकले नाही.”

मात्र, दुसऱ्या दिवशी ती पुन्हा उठली आणि या आशेने चालू लागली की कोणीतरी तिला पाहील आणि घरी परतण्यास मदत करेल. हत्तींचा वावर असलेल्या आणि अधूनमधून पडणाऱ्या मुसळधार पावसात जंगलात एकटी असूनही, ती घाबरली नाही. “मला भीती वाटली नाही. का, ते मला माहित नाही”, असं ती म्हणाली.

अन् ती सापडली

दुसऱ्या दिवशी ती टेकडीवर वरच्या दिशेने चालत गली. एखादा ड्रोन तिला शोधत असेल या जाणीवेने ती टेकडी उतरण्याऐवजी टेकडीवर गेली. पण सतत पडणाऱ्या पावसामुळे तिला थांबावे लागले. “मी पूर्णपणे भिजले होते आणि रात्री खूप थंडी होती, त्यामुळे मला झोप लागली नाही. रविवारी पाऊस असल्याने मी भिजले होते, म्हणून दुपारी १२ वाजेपर्यंत मी वाट पाहत थांबले”, असं तिने सांगितले. शेवटी तिने एका ओढ्याकाठी असलेल्या खडकाचा निवारा घेण्याचा निर्णय घेतला. तिथून तिला शोधणे सोपे होते आणि पिण्यासाठी पाणीही उपलब्ध होते. याच ठिकाणी स्थानिक लोक आणि बचाव पथकाला ती अखेर सापडली.