Kerala toddler death brutal torture mothers partner : प्रेयसीबरोबर राहताना तिच्या मुलाचा अडथळा जाणवत असल्याने लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या पार्टनरने प्रेयसीच्या अवघ्या दीड वर्षांच्या मुलाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. धक्कादायक म्हणजे या हत्येत प्रेयसीचा म्हणजेच त्या चिमुकल्याच्या आईचाही हात होता. केरळातील थिरुवनंतपुरम येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
नेमकं काय झालं?
गेल्या शुक्रवारी दीड वर्षाच्या बालकाला थिरुवनंतपुरम येथील श्री अवीट्टोम थिरुनाल रुग्णालयात तातडीने आणण्यात आलं होतं. त्याच्या आईचा लिव्ह-इन पार्टनर ए. अश्करनेच त्याला रुग्णालयात आणलं होतं. मुलाच्या गळ्यात अन्न अडकल्याचा दावा अश्करने केला. मात्र, रुग्णालयात आणताच त्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. पण डॉक्टरांनी बालकाच्या केलेल्या शवविच्छेदन (पोस्टामॉर्टम) अहवालातून अत्यंत क्रूर आणि धक्कादायक गोष्टीचा खुलासा झाला. आईच्या पाठिंब्याने तिच्या लिव्ह-इन पार्टनरनेच हा गुन्हा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बालकाची आई अखिला (२४) आणि तिचा पार्टनर अश्कर (३१) यांना हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
शवविच्छेदन अहवालातून काय समोर आलं?
मुलाच्या शरीरावर अनेक खुणा होत्या. त्यापैकी अनेक खुणा जुन्या होत्या. शवविच्छेदन अहवालातून अमानुष छळाची ही माहिती समोर आली. शवविच्छेदन अहवालात बालकाच्या शरीरावर नवीन जखमा आणि जुने व्रण मिळून तब्बल ५१ जखमा आढळून आल्या आहेत. या बालकाचा दीर्घकाळापासून वारंवार छळ केला जात असल्याचेही पुरावे तपासात समोर आले आहेत. त्याचे हात मोडलेले होते आणि गुप्तांगावर सिगारेटचे चटके दिल्याचा खुणा होत्या, असंही पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी काय सांगितलं?
नेदुमंगाडचे उपपोलीस अधीक्षक के. बिजू कुमार म्हणाले, “अखिलाबरोबर राहताना त्या मुलाची अश्करला अडचण वाटत होती. त्यामुळे त्याला त्या मुलाचा काटा काढायचा होता. परिणामी बालकाचा बराच काळ छळ केला गेला. आम्ही या प्रकरणाच्या इतर बाजूंचाही तपास करत आहोत. मुलाच्या आईच्या संगनमतानेच हा गुन्हा करण्यात आला. आम्ही अश्करवरील इतर आरोपांचीही चौकशी करत आहोत. सध्या हा तपास प्राथमिक टप्प्यावर आहे.”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्करने चौकशीदरम्यान सांगितले की, नृत्यांगना असलेली अखिला शुक्रवारी एका कार्यक्रमासाठी तमिळनाडूला गेली होती आणि तिने मुलाला त्याच्याकडे सोडले होते. अश्कर मुलाला भरवत असताना मुलाने रडण्यास सुरुवात केली. यामुळे संतापलेल्या अश्करने त्या चिमुरड्याचं डोकं भिंतीवर आदळलं. शवविच्छेदन अहवालात बालकाच्या डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे समोर आलं आहे. तसेच त्याच्या बरगड्या आणि हातही फ्रॅक्चर झाल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालं. मात्र, सायकलवरून अपघाती पडल्यामुळे त्याचे हात फ्रॅक्चर झाले होते, असा दावा अशकरने केला होता.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
या जोडप्याने थिरुवनंतपुरममधील कारिक्कुझी येथील त्यांच्या भाड्याच्या घरात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात उघड झाले आहे. बालकाचे रक्ताने माखलेले कपडे त्यांनी घराच्या मागच्या अंगणात जाळून टाकल्याचं पोलिसांना आढळले आहे. अखिलाचा पती अखिल याने मुलाच्या जन्मापूर्वीच आत्महत्या केली होती. त्यानंतर सुमारे पाच महिन्यांपूर्वी अश्कर आणि अखिला एकत्र राहू लागले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
दरम्यान अश्करचंही २०२१ मध्ये अमिना नावाच्या दुसऱ्या महिलेशी लग्न झालं होतं. अश्करने तिचाही अनन्वित छळ केला. तसंच ती अंथरुणालाही खिळली होती, असा आरोप अमिनाच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर तो तिला सोडून अखिलासोबत राहू लागला. अश्करची पत्नी अमिनाने कोणतीही पोलीस तक्रार दाखल केली नव्हती, परंतु पोलीस या प्रकरणाचीही चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अखिलाची आई एस. रीना यांनी सांगितले की, त्यांना आपल्या नातवावर होणाऱ्या अत्याचाराची कल्पना होती. “दोन महिन्यांपूर्वी मी पोलिसांकडे गेले होते. तेव्हा बालकाच्या हाताला प्लास्टर लावलेले होते. तो सायकलवरून पडला असं अखिला आणि अश्करने मला सांगितलं होतं”, अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
