भारताकडे पर्यटकांचा ओढा वाढावा यासाठी ‘ताजमहाल’ ही जागतिक आश्चर्य असलेली ऐतिहासिक वास्तू कारणीभूत असून, या वास्तूने लाखो पर्यटकांना भारताकडे आकर्षित केले आहे. त्यामुळेच भारताच्या पर्यटनात वाढ झाल्याची माहिती केरळच्या पर्यटन विभागाने ट्विटरद्वारे दिली. सोशल मीडियातून यावर अनेक सकारात्मक प्रतिक्रिया आल्या असून राज्याच्या पर्यटनविभागाने कशा पद्धतीने चांगले काम करायला हवे, हा संदेशच केरळ सरकारने उत्तर प्रदेश सरकारला दिल्याचे यात म्हटले आहे.

भाजपच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांत प्रेमाचे प्रतिक असलेल्या ‘ताजमहाल’बाबत अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली. तसेच या सुंदर वास्तूच्या वारशाबाबत आणि त्याच्या निर्मितीबाबतही प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे काही दिवसांपासून देशातील राजकीय आणि सांस्कृतिक वातावरण ढवळून निघाले आहे.

उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार संगीत सोम यांनी नुकतेच एका भाषणादरम्यान ताजमहालवरुन वादग्रस्त वक्यव्य केले होते. हिंदूंना संपावयला निघालेल्या व्यक्तीने ही वास्तू बांधली. ‘ताजमहाल’ हा भारतीय संस्कृतीवर डाग आहे, असे ते म्हणाले होते. उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाला दरवर्षी कोट्यवधींचा महसूल मिळवून देणाऱ्या ‘ताजमहाल’ला उत्तर प्रदेश सरकारने आपल्या पर्यटनविभागाच्या पुस्तिकेतून वगळले होते. त्याच्या पर्यटनविकासासाठी अर्थसंकल्पात नवी तरतूदही करण्यात आली नव्हती. तसेच आणखी एक भाजप नेते विनय कटियार यांनी नुकताच ‘ताजमहाल’ शिवमंदिराच्या जागेवर उभारल्याचा दावा केला होता.