Wayanad Landslide News Updates: केरळमधील वायनाड जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पावसामुळे एक मोठी दुर्घटना घडली आहे. बोगद्याचे काम सुरू असतानाच कामाजवळ भीषण दरड कोसळली असून, यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले असून, अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मल्लपुरम आणि वायनाड जिल्ह्याला जोडणाऱ्या ‘अनाक्कमपोईल-मेप्पाडी बोगदा रस्ता’ प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या कल्लाडी येथील मीनाक्षी पुलाजवळ ही घटना घडली. दरड कोसळली तेव्हा घटनास्थळावर अनेक बांधकाम कामगार उपस्थित होते.
युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, NDRF च्या तुकड्या पाचारण
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि काही लोकांना सुखरूप बाहेर काढले. सध्या ढिगाऱ्याखाली सुमारे १० जण अडकल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर अपघातात जखमी झालेल्या ६ जणांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अग्निशामक दल आणि आपत्ती निवारण पथक घटनास्थळी पोहोचले असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवानही बचावकार्यात सामील झाले आहेत. केरळचे महसूल मंत्री ए. पी. अनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीआरएफच्या ३० जवानांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य वेगाने सुरू आहे.
२४ तासांत २६५ मिमी पाऊस; प्रशासकीय यंत्रणा सतर्क
गेल्या २४ तासांत या भागात तब्बल २६५ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. सतत कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळेच ही दरड कोसळल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या दुर्घटनेत बोगद्याच्या कामावरील कामगारांची वाहतूक करणारी काही वाहनेही ढिगाऱ्याखाली दबून पूर्णपणे चक्काचूर झाली आहेत.
या भीषण दुर्घटनेनंतर केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीसन यांनी तातडीने कृषिमंत्री टी. सिद्दीकी यांच्यासोबत एक आपत्कालीन बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मंत्री ए. पी. अनिल कुमार आणि मंत्री सिद्दीकी यांना तात्काळ वायनाडला रवाना होऊन प्रत्यक्ष बचावकार्यावर देखरेख ठेवण्यास सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने २० जून रोजीच बांधकाम साईटवरील माती हटवण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले होते, मात्र या आदेशाचे पालन न केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
‘ही नैसर्गिक नव्हे, मानवनिर्मित आपत्ती’; मंत्र्यांचा गंभीर आरोप
दरम्यान, या दुर्घटनेवरून आता राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता आहे. केरळचे मंत्री टी. सिद्दीकी यांनी हा अपघात म्हणजे प्रशासकीय निष्काळजीपणाचा फटका असल्याचे सांगत ही “मानवनिर्मित आपत्ती” असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
“ही नैसर्गिक दरड नसून मानवनिर्मित आपत्ती आहे. हा थेट निष्काळजीपणाचा प्रकार आहे. या साईटवर दरड कोसळण्याचा धोका असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच कोकण रेल्वेला लेखी इशारा दिला होता. मात्र, वारंवार सूचना देऊनही कोकण रेल्वेने यावर कोणतीही पावले उचलली नाहीत,” असा आरोप मंत्री सिद्दीकी यांनी केला.
यावेळी त्यांनी २०२४ मधील मुंडक्काई येथील भीषण दरड दुर्घटनेची आठवण करून दिली, ज्यामध्ये २९८ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. अशा प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
वायनाडसाठी ‘रेड अलर्ट’ जारी
भारतीय हवामान विभागाने वायनाड जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. जिल्ह्यातील मानंथावडी आणि वायथिरी भागात अत्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे. याशिवाय शेजारील कोझिकोड जिल्ह्यालाही रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर मल्लपुरम, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या निकषानुसार, २४ तासांत २०४ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास रेड अलर्ट जारी केला जातो.
वायनाड आणि दरडींचा विदारक इतिहास
वायनाड जिल्ह्याला दरड कोसळण्याचा एक मोठा आणि वेदनादायक इतिहास आहे. हा भाग पश्चिम घाटाचा (सह्याद्री) एक हिस्सा असून केरळमधील सर्वात जास्त दरड प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो.
- ३० जुलै २०२४: वायनाडमध्ये मध्यरात्री झालेल्या भीषण भूस्खलनात २९८ लोकांचा मृत्यू झाला होता.
- १९८४: मुंडक्काई येथील दुर्घटनेत १४ जणांना प्राण गमवावे लागले होते.
- १९९२: पडिंजारेथराजवळील कप्पिक्कलम दरड दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला होता.
पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला हा डोंगराळ भाग भूकंप आणि भूस्खलनाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. सध्या घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
