Kerala man’s suicide after viral bus video: केरळमधील एका बसमध्ये एका ३५ वर्षीय महिला इन्फ्लुएन्सरने ४२ वर्षीय व्यक्तीने आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. मात्र, या आरोपामुळे बसलेल्या मानसिक धक्क्यातून कथितरित्या त्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी आता संबंधित महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ती महिला आणि तो ४२ वर्षीय व्यक्ती हे दोघे गेल्या आठवड्यात एकाच बसमधून प्रवास करत होते. ही एक इन्फ्लुएन्सर असून तिने प्रवासादरम्यान एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, ज्यामध्ये तिने त्या व्यक्तीवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर तिने तो व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केला. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आणि त्याला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले.
व्हिडीओ रेकॉर्ड केल्याच्या दोन दिवसांनंतर, रविवारी त्या व्यक्तीच्या पालकांना त्यांचा एकुलता एक मुलगा कोझिकोडे येथील राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांचा ४२ वर्षीय मुलगा निर्दोष होता आणि या आरोपांमुळे त्याला प्रचंड अपमानित झाल्यासारखे वाटत होते, असे पालकांनी सांगितले. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून दोन दिवस त्याने अन्न घेतले नव्हते.
त्या महिलेने संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावरून डिलिट केला आणि स्वत:चा बचाव करण्यासाठी दुसरा एक व्हिडीओ अपलोड केला. मात्र त्यानंतर तिने तो व्हिडीओदेखील प्रायव्हेट केला. दरम्यान तिने पहिल्यांदा पोस्ट केलेला व्हिडीओ आणि त्या तरूणाची आत्महत्या या दोन गोष्टींची देशभरात चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.
“माझा मुलगा ते सहन करू शकला नाही. त्याच्यावर आजपर्यंत कसलाही चुकीचा आरोर झाला नव्हता,” असे त्या व्यक्तीच्या आईने सांगितले.
पोलिसांनी सोमवारी त्या इन्फ्लुएन्सरवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. केरळ राज्य मानवाधिकार आयोगानेही या घटनेची पोलीस चौकशी करण्याचे आदेश दिले असून, उत्तर विभागाचे पोलीस DIG यांना आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या इन्फ्लुएन्सरला बुधवारी अटक करण्यात आले.
