अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या हत्याप्रकरणात दोन्ही महिलांच्याच एका जवळच्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोन्ही मृत महिला व पोलिसांनी ताब्यात घेतलेली संशयित महिला या तिघी एकमेकींच्या मैत्रिणी होत्या.

कॅलिफोर्नियात एकाच अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या एका मैत्रिणीनेच दुसऱ्या दोन मैत्रिणींची हत्या केल्याचा संशय आहे. या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, या दोन महिलांची हत्या नेमकं कोणत्या कारणांमुळे करण्यात आली? याचा शोध पोलीस घेत आहेत. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

मृतांची ओळख त्रिशूरमधील मुदिक्कोड येथील अंजना हरी आणि तिरुवनंतपुरममधील केशवदासपुरम येथील ॲन मॅथ्यू अशी पटली आहे, तर हत्या केल्याचा संशय असलेली ही महिला केरळच्या कोट्टायमची रहिवासी असून तिची ओळख अनिला म्हणून पटली आहे. ती या दोन्ही महिलांची मैत्रीण होती, अशी माहिती पीडितांच्या कुटुंबीयांनी दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, ॲन मॅथ्यूची अपार्टमेंटमध्येच कथितरीत्या भोसकून हत्या करण्यात आली, तर अंजनाला कारने धडक देण्यात आली. या कथितरीत्या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कुटुंबीयांचा हा आरोप असला तरी अमेरिकन पोलिसांनी या आरोपांबाबत अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही.

कॅलिफोर्निया पोलिसांनी काय म्हटलं?

कॅलिफोर्निया पोलिसांच्या माहितीनुसार, पोलिसांना एका ‘हिट-अँड-रन’च्या घटनेची माहिती मिळाली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले, तेव्हा त्यांना एक महिला गंभीर जखमी अवस्थेत आढळली. धडक दिल्यानंतर निळ्या रंगाची एसयूव्ही घटनास्थळावरून पसार झाली होती असं प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी तपास करत ही निळ्या रंगाची एसयूव्ही शोधून काढली आणि गाडीच्या ३२ वर्षीय चालकाला अटक केली. आता या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सुरेश गोपी यांनी दूतावासाशी संपर्क साधला

दरम्यान, केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी सोमवारी या घटनेची पुष्टी केली. मंत्री गोपी यांनी सांगितलं की, “सोमवारी सकाळी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असून त्या दोन महिलांचे मृतदेह केरळला परत आणण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.”