लोकसभा निवडणुकीत पक्षाची ऐतिहासिक वाताहत झाल्यानंतर कॉंग्रेसमधील नेत्यांनी राहुल गांधीवर त्याचे खापर फोडण्यास सुरुवात केली आहे. केरळ कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेते टी. एच. मुस्तफा यांनी राहुल गांधी यांना चक्क विदूषक म्हणून हिणवले आहे. त्याचबरोबर राहुल गांधींनी स्वतःहून पदाचा राजीनामा दिला नाही, तर पक्षाने त्यांना उपाध्यक्ष पदावरून हाकलावे, अशीही मागणी त्यांनी केली. राहुल यांच्या जागी त्यांची बहिण प्रियांका गांधी यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपविण्याची मागणी त्यांनी केली. मुस्तफा हे केरळ सरकारमध्ये अन्न मंत्री होते.
एकीकडे मुस्तफा यांनी राहुल गांधींवर टीका केली असताना दुसरीकडे पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेता करण्याची मागणी केली आहे. जर राहुल गांधी यांना कॉंग्रेसचे नेतृत्त्व करायचे असेल, तर त्यांच्याकडे पक्षाच्या संसदीय मंडळाच्या नेतृत्त्वाची जबाबदारीही सोपविली पाहिजे, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.