अभिनेता यशच्या केजीएफ चॅप्टर २ चा धमाका केवळ प्रेक्षकांमध्येच नाही तर बॉक्स ऑफिसवरही पाहायला मिळाला. प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. चित्रपटातील रॉकी भाई या मुख्य भूमिकेची तरुणाईमध्ये खूप क्रेझ आहे. १५ वर्षीय चाहत्याला केजीएफ पाहिल्यानंतर, रॉकी भाई बनणे महागात पडले आहे.

हैदराबादमध्ये १५ वर्षांचा मुलगा केजीएफच्या रॉकी भाई या पात्राने इतका प्रेरित झाला की त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आहे. राजेंद्र नगरमध्ये राहणारा १५ वर्षांचा तरुण नुकताच साऊथचा सुपरस्टार यशचा केजीएफ २ चित्रपट पाहून आला होता. या चित्रपटाने तो इतका प्रभावित झाला की तो दिवसातून एक पॅकेट सिगारेट ओढू लागला. इतक्या सिगारेट ओढल्यानंतर या मुलाला घसा दुखू लागला, श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तीव्र खोकला होऊ लागला, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवला.

याबाबत सेंच्युरी हॉस्पिटलचे डॉक्टर रोहित रेड्डी म्हणाले की, या मुलाने सिगारेटचे पॅकेट प्यायले होते, त्यामुळे तो आजारी पडला. ही बाब मुलाच्या पालकांना सांगण्यात आली असून, ते त्याची काळजी घेत आहेत.

“आजच्या तरुणांना पटकन रॉकी भाई सारख्या पात्रांनी प्रेरित केले आहे. अशात या मुलाने सिगारेटची निवड केली आणि सिगारेटचे पॅकेट ओढल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. चित्रपटांचा आपल्या समाजावर फार लवकर परिणाम होतो, त्यामुळे सिगारेट ओढणे, तंबाखू चघळणे किंवा दारू पिणे यासारखे कृत्य न करण्याची नैतिक जबाबदारी चित्रपट निर्माते आणि कलाकारांची आहे. रॉकी भाई सारख्या पात्रांना मोठ्या पडद्यावर पाहून तरुणांना सर्वात जास्त प्रेरणा मिळते,” असेही डॉ. रेड्डी म्हणाले.

पालकांनी मुलांची काळजी घ्यावी

“पालकांनी त्यांच्या किशोरवयीन मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे की ते काय करत आहेत आणि त्यांच्यावर कोणत्या गोष्टींचा परिणाम होत आहे. नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा पालकांनी आपल्या मुलांना गोष्टींच्या दुष्परिणामांची अगोदरच जाणीव करून देणे चांगले आहे. सिगारेट ओढणे, दारू पिणे, तंबाखू खाण्याचे काय तोटे आहेत हे त्यांना मुलांना सांगावे लागेल. अशा वेळी मुलांना मारहाण करणे ही चांगली गोष्ट नाही, त्याचे परिणामही चांगले नाहीत,” असेही डॉ. रेड्डी म्हणाले.