Video: ममता बॅनर्जींप्रमाणेच अखिलेश यादवांनीही ‘खेला होबे’ म्हणत भाजपाविरोधात ठोकला शड्डू

समाजवादी पार्टीने प्रसिद्ध केलेल्या या गाण्याच्या माध्यमातूनही अखिलेश यादव यांनी उत्तरप्रदेशातल्या योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांचं नवं प्रचारगीत प्रदर्शित करण्यात आलं आहे.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये खेला होबे अशी घोषणा देत भाजपाला चितपट केलं होतं. त्याच धर्तीवर आता अखिलेश यादवही ‘खेला होबे’चं आव्हान भाजपाला देत निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. समाजवादी पार्टीने शुक्रवारी आपलं नवं प्रचारगीत प्रसिद्ध केलं आहे. ‘खेला होबे’च्याच धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या गीताचे ‘बोल मुंह के बल बीजेपी गिरिहे, खदेंडा होईबे’ असे आहेत. सोशल मीडियावर सध्या हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे.

या वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या पश्चिम बंगालमधल्या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या ‘खेला होबे’ या घोषणेची चांगलीच चर्चा झाली होती. समाजवादी पार्टीने प्रसिद्ध केलेल्या या गाण्याच्या माध्यमातूनही अखिलेश यादव यांनी उत्तरप्रदेशातल्या योगी सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच आगामी निवडणुकांमध्ये भरघोस मतांनी विजयी होणार असल्याचा दावाही केला आहे. गाण्यात असं म्हटलं आहे की जर समाजवादी पार्टीचं सरकार पुन्हा आलं तर उत्तरप्रदेशात आनंदी आनंद होईल. या गाण्यात अगदी शिताफीने ‘मेला होईबे’, ‘खदेडा होईबे’, ‘खेला होईबे’ अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या गाण्यात अवधि आणि भोजपुरी शब्दांचा प्रामुख्याने वापर करण्यात आला आहे.

उत्तरप्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोजपुरी गायक आणि नेता निरहुआ यानेही एक गाणं गायलं आहे. या गाण्यातून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विकास कामं सांगितली जात आहेत तसंच मतदारांना योगी आदित्यनाथ यांच्या कामाचं महत्त्व पटवून दिलं जात आहे. ‘चाहे जोर लगा लो..चाहे जितना शोर मचा लो, आएंगे फिर योगी ही…’, असे या गाण्याचे बोल आहेत.

उत्तरप्रदेशात विधानसभेच्या ४०३ जागांसाठी मतदान होतं. यामध्ये सरकार बनवण्यासाठी २०२ जागांची गरज असते. २०१७ साली उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३१२ जागा मिळवल्या होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Khadeda hobe akhilesh yadav re tunes mamata banerjees khela hobe to take on bjp vsk