नवी दिल्ली : देशामध्ये खादी आणि हातमागावरील वस्त्रांची विक्री वाढत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मध्ये सांगितले. यामुळे देशामध्ये रोजगाराच्या संधी वाढत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, खादी ग्रामोद्याोगच्या व्यवसायाने प्रथमच १.५ लाख कोटींचा टप्पा ओलांडला असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली. हेही वाचा >>> Delhi Coaching Incident: दिल्लीत IAS कोचिंग सेंटर दुर्घटनेनंतर एमसीडीची मोठी कारवाई, तळघरांतील १३ कोचिंग सेंटर्स सील दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी आकाशवाणीवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये मोदी यांनी खादीसंबंधी आपली मते मांडली. ते म्हणाले की, ‘‘यापूर्वी जे लोक खादी वापरण्यास इच्छुक नव्हते ते आता अभिमानाने ही उत्पादने वापरत आहेत. खादी ग्रामोद्याोगच्या व्यवसायाने प्रथमच १.५ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे? खादीची विक्री किती वाढली आहे हे तुम्हाला माहित आहे का? चारशे टक्के. वाढत्या विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या नवीन संधी वाढत आहेत. या उद्याोगात बहुसंख्य महिला असल्याने त्यांना सर्वाधिक फायदा होत आहे.’’ यावेळी मोदी यांनी ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ, गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताला मिळालेले यश, आसाममधील ‘मोइदाम’चा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झालेला समावेश अशा विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले. त्याबरोबरच तरुणांमध्ये अंमली पदार्थांचे सेवन वाढत असल्याबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. यामुळे पालकांमध्ये काळजीचे प्रमाण वाढत आहे, अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी ‘१९९३’ ही टोल-फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अंमली पदार्थांविरोधातील लढाईमध्ये हे मोठे पाऊल आहे असे मोदी म्हणाले.