पीटीआय, चंडीगड
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याचे चुलते आणि वाहनचालक हे जालंधर पोलिसांपुढे शरण आले आहेत. दरम्यान, राज्यातील मोबाइल इंटरनेट व लघुसंदेश सेवांवरील स्थगिती पंजाब सरकारने मंगळवार दुपापर्यंत वाढवली आहे.कट्टर धर्मोपदेशक अमृतपालचा शोध सोमवारी तिसऱ्या दिवशीही सुरू होता. त्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी राज्य पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपालचे चुलते हरजीत सिंग व चालक हरप्रीत सिंग हे दोघे जालंधरच्या मेहतपूर भागातील बुलंदपूर गुरुद्वारानजीक शरण आले. पोलीस उपमहानिरीक्षक निरदर भार्गव यांच्यासह इतर पोलीस अधिकारी यावेळी हजर होते. अमृतसर ग्रामीण पोलीस नंतर या दोघांनाही घेऊन गेले.
गायक- कार्यकर्ता दीप सिद्धू याने स्थापन केलेल्या ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेची खाती ताब्यात घेण्यात हरजीत याने अमृतपालला पदत केली. तो नेहमी अमृतपालसोबत दिसून येत असे, असे पोलिसांनी सांगितले. सिद्धूचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर अमृतपाल हा या संघटनेचा प्रमुख झाला.
अमृतपालचा शोध अद्याप सुरू आहे, असे जालंधर (ग्रामीण)चे वरिष्ठ पोलीस अधीक्षक स्वर्णदीप सिंग यांनी सांगितले. यापूर्वी, पोलिसांनी अमृतपालच्या ताफ्यातील दोन वाहने जप्त केली. अमृतपालच्या वाहनाचा पोलीस पाठलाग करत असल्याचे सीसी टीव्ही चित्रीकरण सोमवारी समाजमाध्यमांवर फिरत होते.
दरम्यान, राज्यातील मोबाइल इंटरनेट व लघुसंदेश सेवांवरील स्थगिती पंजाब सरकारने मंगळवार दुपापर्यंत वाढवली.अमृतपालच्या पाच साथीदारांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा
चंडीगड : अमृतपाल सिंग याच्या ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेशी संबंधित पाच जणांविरुद्ध आपण कठोर असा राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लावला असल्याचे पंजाब पोलिसांनी सोमवारी सांगितले. अमृतपाल सिंग हा अद्याप फरार असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पंजाबचे पोलीस महानिरीक्षक सुखचैन सिंग गिल यांनी सांगितले. ‘वारिस पंजाब दे’च्या कार्यकर्त्यांविरुद्ध सहा एफआयआर दाखल केले असून, ११४ लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाशी ‘आयएसआय’चा संबंध असून संघटनेला परदेशातून निधी मिळत असल्याचा संशय आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
हिमाचल प्रदेशात खबरदारीचा इशारा
शिमला : अमृतपाल सिंग याच्या विरोधात सुरू असलेल्या धडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमध्ये खबरदारीचा इशारा देण्यात आला असून, पंजाबलगतच्या सीमेवर सुरक्षाव्यवस्था आवळण्यात आली आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री सुखिवदर सिंह सुक्खू यांनी सोमवारी सांगितले. राज्याबाहेरून येणाऱ्या पर्यटकांना कुठलीही गैरसोय सोसावी लागू नये आणि कुठल्याही समाजकंटकाला राज्यात प्रवेश करता येऊ नये हे निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.