Khamenei Funeral Iran Thanks India: दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाल्याबद्दल इराणने भारताचे जाहीर आभार मानले आहेत. अमेरिकेच्या राजनैतिक दबावामुळे अनेक देशांनी या समारंभातून माघार घेतली किंवा आपले प्रतिनिधित्व कमी केले, अशा बातम्या इराणच्या मीडियामध्ये आल्यानंतर इराणने ही कृतज्ञता व्यक्त केली आहे.

इराणच्या तस्नीम न्यूज एजन्सीनुसार, अमेरिकेच्या राजनैतिक दबावामुळे दोन आखाती देशांसह किमान १३ देशांनी खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणे टाळले किंवा आपले प्रतिनिधित्व कमी केले. तस्नीमने वृत्त दिले आहे की, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी स्वतः किमान पाच अरब सरकारांशी संपर्क साधून त्यांना तेहरानमधील अंत्ययात्रेत सहभागी न होण्याचे आवाहन केले होते. सोमवारी (६ जुलै रोजी), भारतातील इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या दूतावासाने ‘एक्स’ वर एका पोस्टद्वारे अंत्यसंस्कार सोहळ्यात सहभागी झाल्याबद्दल भारत सरकार आणि भारतीय जनतेचे आभार मानले.

इराणी दुतावासाने काय म्हटलं?

इराणी दूतावासाने ट्विट केलं, “भारतातील इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे दूतावास, भारत सरकार आणि भारतीय जनता, विशेषतः भारत सरकार आणि जनतेच्या वतीने उपस्थित राहिलेल्या अधिकृत शिष्टमंडळाचे मनापासून आभार मानत आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे शहीद नेते, हजरत अयातुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमात सहभागी होऊन आदरांजली वाहिल्याबद्दल दूतावास आपली मनापासून कृतज्ञता व्यक्त करत आहे.”

“या शोकाकुल सोहळ्यात राजकीय नेते, संसद सदस्य, प्रख्यात विद्वान, विचारवंत आणि भारतातील विविध पंथ व धार्मिक समुदायांच्या नेत्यांच्या आदरणीय उपस्थितीने आपल्या दोन्ही देशांमधील सखोल ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि मानवी संबंधांचे दर्शन घडवले. राष्ट्रीय शोकाच्या या काळात इराणच्या जनतेशी असलेला परस्पर आदर आणि प्रामाणिक एकजूट व्यक्त करणारे हे एक शक्तिशाली पाऊल होते”, असंही पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“इराणचे लोक मैत्री, आपुलकी आणि मनापासून केलेला आदर विसरणार नाहीत. ते याकडे इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण आणि रिपब्लिक ऑफ इंडिया यांच्यातील अतुट संबंधांचा एक मौल्यवान पुरावा म्हणून पाहतात, जो आपल्या दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्री अधिक मजबूत करण्यासाठी एक मोलाचा पाया ठरेल. भारतातील इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे दूतावास या दुःखाच्या काळात इराणच्या जनतेच्या पाठीशी उभे राहणाऱ्या आणि आपल्या संवेदना व्यक्त करणाऱ्या सर्व भारतीय अधिकाऱ्यांचे, मान्यवर व्यक्तींचे आणि भारतातील थोर जनतेचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानत आहे”, असंही म्हटलं.

अंत्यसंस्काराला भारतातून कोण कोण उपस्थित होतं?

या अंत्यसंस्काराला भारत सरकारच्या वतीने परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा आणि बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन (निवृत्त) यांनी प्रतिनिधित्व केले. या अधिकृत शिष्टमंडळासोबत इतर अनेक भारतीय मान्यवरही उपस्थित होते. यामध्ये जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शिद आणि भारतातील विविध धार्मिक परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धार्मिक नेत्यांचा समावेश होता.