इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कारासाठी भारताकडून उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाठवले जाणार आहे. बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्र मार्गेरिटा भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढील महिन्यात इराणचा दौरा करतील, अशी माहिती समोर आली आहे. या नेत्यांसोबत परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित असणार आहेत.

२८ फेब्रुवारी रोजी तेहरान येथे अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता.

पंतप्रधान मोदींना निमंत्रण, पण…

इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४ ते ९ जुलै दरम्यान होणाऱ्या या अंत्यविधी सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण पाठवले होते. नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाने गेल्या मंगळवारी हे निमंत्रण परराष्ट्र मंत्रालयाकडे सुपूर्द केले. मात्र, याच काळात पंतप्रधान मोदींचा पूर्वनियोजित बहुराष्ट्रीय दौरा असल्याने, वेळेअभावी ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. यामुळेच भारताने आपले विशेष प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

५ दिवस चालणार अंत्यविधी कार्यक्रम

खामेनी यांच्या अंत्यविधीचे विधी ४ जुलैपासून तेहरानमध्ये सुरू होतील, तर ९ जुलै रोजी त्यांच्या ‘मशहद’ या मूळ गावी त्यांना दफन केले जाईल. आधी हा अंत्यविधी मार्च महिन्यात होणार होता, परंतु त्या काळात मध्यपूर्वेत पेटलेल्या युद्धामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता.

यापूर्वी २०२४ मध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर-अब्दुल्लाहियान यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता, तेव्हा भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तेहरानला भेट देऊन भारताच्या वतीने श्रद्धांजली वाहिली होती.

जागतिक नेत्यांना निमंत्रण

इराणने पंतप्रधान मोदींशिवाय चीन, रशिया, कतार, फ्रान्स आणि पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांनाही आमंत्रित केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी त्यांचे शिष्टमंडळ इराणला जाणार असल्याचे गेल्या शुक्रवारीच स्पष्ट केले होते. नुकताच अमेरिका आणि इराण यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारताला पाठवलेले हे निमंत्रण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. पश्चिम आशियातील बदलत्या राजकीय समीकरणांनंतरही इराण भारताला आपला एक महत्त्वाचा आणि विश्वासू धोरणात्मक भागीदार मानतो, हाच संदेश यातून दिला गेल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

युद्धकाळातही भारत-इराण संबंध दृढ

गेल्या काही महिन्यांत मध्यपूर्वेत लष्करी संघर्ष सुरू असतानाही भारत आणि इराणमधील द्विपक्षीय चर्चा थांबली नव्हती. भारताने या संपूर्ण वादात अत्यंत संतुलित भूमिका घेतली आहे. गेल्याच महिन्यात इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची ब्रिक्स परिषदेसाठी भारतात आले होते, तर गेल्या आठवड्यात इराणचे ऊर्जामंत्रीही ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीसाठी भारतात उपस्थित होते.

चाबहार बंदर आणि भारत-इराण ऐतिहासिक संबंध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे २०१६ मध्ये इराणचा अधिकृत दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी खामेनी आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांची भेट घेऊन ‘चाबहार बंदराच्या’ विकासासाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. यात अफगाणिस्तानचाही समावेश होता.

त्यानंतर २०१८ मध्ये हसन रुहानी भारताच्या दौऱ्यावर आले होते.

ऑक्टोबर २०२४ मध्ये रशियातील कझान येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि इराणचे विद्यमान अध्यक्ष पेझेश्कियान यांच्यात भेट झाली होती, ज्यामध्ये मोदींनी पेझेश्कियान यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले होते.