प्रसिध्द शिक्षक आणि युट्युबर फैजल खान सर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पाटण्यातील त्यांच्या ‘खान ग्लोबल स्टडीज्’ या कोचिंग इन्स्टिट्यूटबाहेर काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसक राड्यानंतर, आता ही संस्था अग्निशामक दलाच्या रडारवर आली आहे. रविवारी बिहार अग्रिशामक दलाने या इन्स्टिट्यूटमध्ये अचानक ‘फायर सेफ्टी ऑडिट’ केले. या तपासणीत संस्थेच्या इमारतीमध्ये सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.
सात दिवसांची नोटीस आणि त्रुटी
अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खान सरांच्या या संस्थेत अनेक महत्त्वाच्या अग्निसुरक्षा यंत्रणांचा अभाव आहे. सहाय्यक जिल्हा अग्निशामक अधिकारी अजय कुमार शर्मा यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान संस्थेच्या इमारतीत कोणतीही ‘फायर अलार्म सिस्टम’ नव्हती. तसेच आणीबाणीच्या वेळी आग विझवण्यासाठी आवश्यक असणारा ‘फायर पंप’ उपलब्ध नव्हता आणि इमारतीवरील पाण्याच्या टाकीची क्षमताही पुरेशी नव्हती.
खान ग्लोबल स्टडीजने आपल्या एका नवीन इमारतीसाठी अग्निशामक दलाकडे ‘फायर सेफ्टी सर्टिफिकेट’ (ना हरकत प्रमाणपत्र) मागितले होते. या अर्जाची पडताळणी करण्यासाठी अधिकारी तेथे पोहोचले असता हा प्रकार उघडकीस आला. या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाने संस्थेला एक आठवड्याची (७ दिवस) मुदत दिली आहे. या कालावधीत त्रुटी सुधारल्या नाहीत, तर कोचिंग इन्स्टिट्यूट पूर्णपणे सील करण्यात येईल, असा इशारा अग्निशामक दलाचे डीआयजी मनोज कुमार नत यांनी दिला आहे.
बिहार सरकारची कडक पावले
दिल्लीतील एका हॉटेलला लागलेली आग आणि बिहारच्या मुझफ्फरपूरमधील ‘प्रसाद हॉस्पिटल’मध्ये झालेल्या अग्नितांडवानंतर बिहार सरकारने सुरक्षेबाबत अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. मुझफ्फरपूर येथील दुर्घटनेत ६ लोकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर, बिहार अग्निशामक दल कायदा आणि नियम २०२१ नुसार संपूर्ण राज्यात हॉटेल, रुग्णालये आणि कोचिंग क्लासेसचे ऑडिट केले जात असून, गेल्या दोन दिवसांत ६० ते ७० संस्थांची तपासणी करण्यात आली आहे.
आधीच सुरू आहे पोलिसांचा तपास
खान सर सध्या केवळ अग्निसुरक्षेच्या मुद्द्यावरूनच नाही, तर एका गुन्हेगारी प्रकरणामुळेही वादात सापडले आहेत. २ जून रोजी त्यांच्या इन्स्टिट्यूटबाहेर झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी दोन सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे. या रक्षकांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, खान सरांच्या सांगण्यावरूनच त्यांनी तिथे गोळीबार केला होता. या जबाबानंतर पोलिसांनी खान सरांवर ‘हत्येचा प्रयत्न’ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसरीकडे, खान सरांच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून हा कारवाई सूडबुद्धीने केली जात असल्याचा दावा केला आहे. ते लवकरच न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार आहेत. अग्निशामक दलाची नोटीस आणि पोलिसांची कारवाई यामुळे खान सरांच्या अडचणी मात्र नक्कीच वाढल्या आहेत.
