NEET Cancelled: नीट परीक्षा रद्द झाल्याने सर्वत्र संतापाची लाट पाहायला मिळत आहे. पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आल्याने ०३ मे रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आल्याचे ‘एनटीए’कडून स्पष्ट करण्यात आले. यावरुन आता प्रसिद्ध शिक्षक खान सर यांनी ‘एनटीए’वर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत असल्याचा आरोप करत ‘एनटीए’च्या विश्वासार्हतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
खान सरांकडून टीका
“हा लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार आहे, त्यांच्या आत्मविश्वास तर पूर्णपणे खचला असेल”, असे खान सर म्हणाले. “धक्कादायक बाब म्हणजे दोन वर्षापूर्वी २०२४ मध्ये असाच प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरानंतर देखील सीबीआय तपास करण्यात आला होता. पण, यातून काहीच निष्पन्न झाले नाही”. खान सरांनी राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या पारदर्शकता आणि सुरक्षितपणे होण्याच्या प्रक्रियेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
एनटीएवर प्रश्नचिन्ह
परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी असणाऱ्या संस्थांच्या जबाबदारीबाबतही खान सरांनी भाष्य केले. “सरकारी संस्थांना याचे भान असायला हवं की त्यांच्यावर परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे ना की पेपर फोडण्याची”, अशा शब्दात त्यांनी सरकारी संस्थांवर ताशेरे ओढले. “राष्ट्रीय चाचणी संस्थेचे नाव बदलून नेव्हर ट्रस्टेबल एजन्सी असे नामकरण करावे. दहा रुपयांना मिळणारे लहान मुलांचे डायपर देखील लीक होत नाही पण परीक्षेचे पेपर लीक होत आहेत”, अशी टीका खान सरांनी केली.
सीबीआयच्या तपासावर शंका
नीट पेपरफुटीच्या प्रकरणाची सीबीआय करणार असलेल्या तपासावर देखील खान सरांनी शंका उपस्थित केली. “विद्यार्थ्यांचे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाले तरी सीबीआयचा तपास पूर्ण होणार नाही”, असा टोला खान सरांनी लगावला. तसेच, या प्रकरणाचा तपास व्यवस्थित होत आहे की नाही हे तपासण्यासाठी निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करण्याची मागणी खान सरांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील यात थेट हस्तक्षेप करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नीट परीक्षा रद्द झाल्याने मुलांवर मानसिक आघात होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
गरीब विद्यार्थ्यांना फटका
नीट परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या गरीब घरातील विद्यार्थ्यांना याचा फटका बसेल असे खान सर म्हणाले. “विद्यार्थ्यांना घरातील परीक्षेची तयारी करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी कुटुंबीय पाठवत असतात. कोणी एक वर्षासाठी, कोणी दोन महिन्यांसाठी पाठवत असते. यामागे कष्ट असतात. एसीच्या खोलीत राहणाऱ्यांना या समस्या कळणार नाहीत”, असे खान सर म्हणाले.
