Khan Sir Patna Coaching Firing: कोचिंग क्लासेसच्या व्यावसायिक स्पर्धेतून बिहारमधील पाटणा येथे मंगळवारी रात्री प्रसिद्ध शिक्षक आणि यूट्यूबर खान सर यांच्या कोचिंग क्लासबाहेर गोळीबार करण्यात आला. मुसल्लापूर हाट परिसरात असलेल्या इन्स्टिट्यूटच्या बाहेर हा गोळीबार करण्यात आला. या घटनेत एक सुरक्षा रक्षक जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खान सर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना या घटनेवर संताप व्यक्त केला. मुसल्लापूर परिसरात असलेल्या कोचिंग संस्थांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धा आणि व्यावसायिक संघर्षातून ही घटना घडली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक कोचिंग उद्योगातील वर्चस्वावरून खान सरांची संस्था आणि एका प्रतिस्पर्धी शिकवणी केंद्रामध्ये तणाव वाढला होता.
माध्यमांशी बोलताना खान सर म्हणाले, “स्वस्तात का शिकवतो? असा प्रश्न मला प्रतिस्पर्धी विचारत आहेत. कमी शुल्क घेऊनही आमचा निकाल चांगला लागतो. एवढ्या कमी शुल्कात शिकवू नये, अशी काही जणांची सातत्याने विचारणा होते. माझी प्रशासनाला विनंती आहे की, त्यांनी योग्य ती सुरक्षा पुरवावी. कारण गरिबांनाही शिक्षण घेण्याचा अधिकार आहे.
#WATCH | Patna, Bihar: Educator Khan Sir says, "… The main issue seems to be that why are we teaching for such low fees? Why are we getting such massive results? We appeal to the administration to keep security concerns in mind, recognizing that the poor, too, have the right to… https://t.co/5fSeoroGWH pic.twitter.com/wwxRMZCyxl
— ANI (@ANI) June 2, 2026
हजारोंच्या संख्येने जेव्हा निकाल लागतो, तेव्हा अशा पद्धतीने काही असामाजिक तत्वे खवळतात. शेजारी असलेल्या कोचिंग क्लासचा या हल्ल्यामागे हात आहे. त्यांनी जाहीरपणे सांगितले होते की, खान सरांचे कोचिंग आम्ही उडवून टाकू. प्रशासनाला विनंती आहे की, त्यांनी आम्हाला सुरक्षा पुरवावी, असेही खान सर म्हणाले.

पोलिसांनी काय म्हटले?
खान सर कोचिंग संस्थेच्या परिसरातील एक व्यक्ती गोळीबार करताना दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे. या माहितीची पडताळणी करत आहोत. सदर घटनेबाबत वेगवेगळे दावे केले गेले आहेत. पोलीस या घटनेचा सखोल तपास करून सर्व पैलूंनी तपास केला जात आहे, अशी प्रतिक्रिया पाटण्याच्या पोलीस अधीक्षक दिक्षा यांनी दिली.
